Wrong Panchnama Of Flooded Area Kolhapur Marathi News
Wrong Panchnama Of Flooded Area Kolhapur Marathi News

14 जणांना पाच लाख, तर 104 जणांना 7 लाख मदत...भरपाईची अजब तऱ्हा

आजरा : कोरिवडे (ता. आजरा) येथील गतवर्षी अतिवृष्टीमध्ये पूरबाधित क्षेत्राचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व पोलिसपाटील यांनी केलेले सर्वेक्षण व पंचनामे हे चुकीचे आहेत. केवळ 14 जणांना पाच लाख 9 हजार 393 रुपयांचा अधिक लाभ दिला आहे. 104 जणांना 7 लाख 68 हजार 860 रुपयांचा लाभ मिळाला आहे. नुकसान झालेल्या काहीजणांची नावे यादीतून वगळली आहेत, असा आरोप कोरिवडे येथील शेतकऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

उपसरपंच दत्ता पाटील म्हणाले, ""गतवर्षीच्या अतिवृष्टीमध्ये कोरिवडेत शेतीचे मोठे नुकसान झाले. सदर नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलिसपाटील यांच्या समितीने केले. यामध्ये संगनमत करून काही लोकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न समितीने केला आहे. जंगल क्षेत्रावरील गवत पड जमीन, माळरानामध्ये उसाचे क्षेत्र दाखवून लाभ देण्यात आला आहे. कच्च्या कागदावर पंचनामे करून नंतर ते बदलण्यात आले आहेत. बोगस सह्या व अंगठे मारले आहेत.

एकाच घरातील चौघांना व पिता पुत्रांना लाभ देण्याचे प्रकारही घडले आहेत. काहीचे खरोखरच नुकसान झाले आहे त्यांना यादीतून वगळले गेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे काही जण लाभापासून वंचित राहिले असून यामध्ये घोटाळा झाला आहे. याबाबत 70 ग्रामस्थांनी तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दाद मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही बाब आमदार प्रकाश आबिटकर यांच्याही निर्देशनास आणून दिली आहे. याबाबत चौकशी समिती नेमली आहे. या समितीलाही तलाठी व अन्य तिघांनी केलेले चुकीचे सर्वेक्षण व पंचनामे निर्देशनास आणून दिले आहे.

सदर प्रकरणात दोषी असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत वंचित लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. वारेमाप नुकसान भरपाईची वसुली होत नाही. तलाठी व अन्य तिघांच्यावर कारवाई होत नाही. तोपर्यंत लढा चालूच राहणार आहे.'' या वेळी लिंगनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष कृष्णा रायकर, बळीराजा पतसंस्थेचे उपाध्यक्ष वसंत कळेकर, पांडुरंग दुध संस्थेचे अध्यक्ष सयाजी नार्वेकर, संदीप रायकर, भिकाजी पाटील, महादेव पाटील, नेताजी पाटील, चंद्रकांत पाटील, संतोष दिनकर पाटील, जोतीबा रायकर व शेतकरी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com