माणुसकीच्या उजेडानं चाळीस वर्षांचा अंधार दूर 

माणुसकीच्या उजेडानं चाळीस वर्षांचा अंधार दूर 

माणुसकीच्या उजेडानं चाळीस वर्षांचा अंधार दूर 

कोल्हापूर  : घरात चाळीस वर्षांचा अंधार. रात्री दिवा लावूनच घराला प्रकाशमान करण्याचा खटाटोप. वीज घेण्यासाठी ना पैसे ना अर्ज करण्याची माहिती. प्रतिकुल परिस्थितीला भेदण्याचं सामर्थ्यचं नाही, तिथं घरात वीज देणारा मदतीचा हातही नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या ह्दयाला फुटलेल्या पाझरानं मात्र चित्र बदललं आणि यळगूडच्या (ता. हातकणंगले) पार्वतीबाई कांबळे यांच घर प्रजासत्ताकदिनी प्रकाशमान झालं. माणुसकीच्या उजेडानं अखेर चाळीस वर्षांचा अंधार दूर झाला.

पार्वतीबाई यांच वय ऐंशीहून अधिक. त्यांच विटा-मातीच साधं कौलारू घर. जेवणासाठी चूल आणि भिंतीवरील फळ्यांवर भांड्यांची रांग. घरात वीज नसल्याने दिवा लावूनच त्या जेवण करायच्या. त्यांची होणारी ससेहोलपट मनाला हेलावणारी होती. रोज अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्यांची कोणतीच तक्रार नव्हती. एका डोळ्याने आंधळेपण असूनही त्या पोटापाण्यासाठी सकाळीच बाहेर पडायच्या. शेजारच्या घरात वीजमीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या बंद घरातील अंधाराची कल्पना नव्हती.

आठवडाभरापूर्वी वीजमीटर रिडींग एजन्सीचे म्हाळू मुदाळे यांना त्यांच्या घरात वीज नसल्याची माहिती मिळाली. त्यांनी ती लगेच महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. महावितरणचे अधिकारी व वीज मीटर रिडींगच्या कर्मचाऱ्यांनी विजेसाठीचे तत्काळ कोटेशन तयार केले. स्वत:च्या खिशातील पैसे काढून त्यांच्या घरात फिटिंग केले. हुपरीचे उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबे, हुपरी ग्रामीणचे शाखा अभियंता सोमय्या जमादार, हुपरीचे सुनील मंगसुळी व रिडींग एजन्सीचे म्हाळू मुदाळे यांनी प्रजासत्ताक दिनी त्यांच्या घरात वीजमीटर बसवून घर प्रकाशमान केले. त्यांची विचारपूस करत जिलेबी भरवून त्यांचे तोंडही गोड केले. तसेच औषधोपचारासाठी आर्थिक मदतही केली. 

वयाची ऐंशी ओलांडलेल्या पार्वतीबाई आजही कष्ट करून उदरनिर्वाह करतात. त्यांना वीज बिल देणे शक्‍य नाही. त्यांचा बीपीएल योजनेत समावेश केला जाणार आहे. तसेच त्यांचे महिन्याकाठीचे वीज बिल महावितरण व वीज मीटर रिडींग एजन्सीचे कर्मचारी भरतील. 
- रामेश्‍वर कसबे, उपकार्यकारी अभियंता, हुपरी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com