गडहिंग्लजमध्ये यंदा पाण्याला नाही तोटा 

This Year Abundant Water In Gdahinglaj Taluka Kolhapur Marathi News
This Year Abundant Water In Gdahinglaj Taluka Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : तालुक्‍यात यंदा पाण्याला तोटा नाही. गतवर्षी ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे यंदा चांगले दिवस पहायला मिळत आहेत. हिरण्यकेशी नदीसह तालुक्‍यातील विविध तलावांमधील पाण्यालाही अजून तरी उपसाबंदी लागू केलेली नाही. तलावांमध्ये गतवर्षीपेक्षा 15 ते 60 एमसीएफटीने पाणीसाठा अधिक असल्याने शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाले असून यंदा उपसाबंदीला सोडचिठ्ठी मिळते की काय, अशी परिस्थिती तयार झाली आहे. 

तालुक्‍यात हिरण्यकेशी नदीला चित्रीचे, तर घटप्रभेला फाटकवाडीचे बारमाही पाणी असते. तालुक्‍यात नरेवाडी, तेरणी, येणेचवंडी, करंबळी, वैरागवाडी, शेंद्री आणि कुमरी तलाव आहेत. हिरण्यकेशी नदीतील पाण्याचे नियोजन करून उपसाबंदी लागू केली होती. गतवर्षीही चित्री प्रकल्प शंभर टक्के भरला होता. परंतु पावसाचे पाणी साठवणूक आणि आवर्तनातील सावळ्या गोंधळामुळे अखेरच्या टप्प्यात पाणी कमी पडते की काय, अशी अवस्था तयार झाली होती.

ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम राहिला. यामुळे डिसेंबरपर्यंत पाण्याचा उपसाच झाला नाही. पावसाचे अडवलेले पाणी जानेवारीपर्यंत पुरले. यामुळे 23 जानेवारीला चित्रीतून पहिले आवर्तन सोडले. अजूनही हिरण्यकेशीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा आहे. उपसाबंदी लागू न केल्याने रात्रीचा उपसा कमी झाला असून यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होत असल्याचे चित्र आहे. 

हिरण्यकेशी नदीवरील निलजी बंधाऱ्याखाली (लाभक्षेत्राबाहेर) उपसाबंदी कायम ठेवली आहे. दहा दिवस उपसा आणि 20 दिवस बंदी असे रोटेशन लावले आहे. चित्रीचे पाणी खोत बंधाऱ्यापर्यंत दिले जाते. यामुळे खणदाळ, नांगनूरसह इदरगुच्ची, कडलगे आदी गावांना बारमाही पाणी उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात तालुक्‍यातील तलावांमधील साठा अत्यंत कमी होता. उपसाबंदी लागू करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी एकाही तलावावर उपसाबंदी अजून लागू केलेली नाही.

शेतकऱ्यांच्या बैठका घेवून पाणी नियोजन केले आहे. रात्रीचा उपसा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपलब्ध साठा जुलैपर्यंत पुरेल या पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना पाण्याची शाश्‍वती मिळाली असल्याने उपसा योग्य वेळी सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे फेब्रुवारी संपत आला तरी पाणीसाठा मुबलक आहे. एकाही तलावावर उपसाबंदी लागू केलेली नाही. तरीसुद्धा पाणीसाठा गतवर्षीपेक्षा बऱ्यापैकी असल्याने जुलैपर्यंत उपलब्ध पाणी पुरण्यास मदत होणार आहे. 

चित्रीतून दुसरे आवर्तन 
चित्री प्रकल्पातून उद्या (ता. 25) पाण्याचा दुसरे आवर्तन हिरण्यकेशी नदीत सोडण्यात येणार आहे. 180 क्‍युसेक्‍सने पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी खोत बंधाऱ्यापर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे साधारण 300 एमसीएफटी पाणी लागणार आहे. पहिल्या आवर्तनात 334 एमसीएफटी पाण्याचा वापर झाला आहे. पहिल्या आवर्तनातील अजूनही बहुतांशी बंधाऱ्यांत पाणी शिल्लक असल्याने दुसऱ्या आवर्तनात पाणी कमी लागणार आहे. सध्या चित्रीमध्ये 1500 एमसीएफटी (80 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com