यंदा ‘एनआयटी’मधील जागा रिक्तच

युवराज पाटील
Monday, 16 November 2020

गेल्या वर्षीच्या अधिकृत आकडेवारीनुसार ३१ एनआयटीमधील ३ हजार ३३४ जागा रिक्त राहिल्या होत्या.

कोल्हापूर (शिरोली पुलाची) : देशातील गुणवंत विद्यार्थी ज्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात, त्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था(एनआयटी) या भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत सर्व फेऱ्या संपूनही दरवर्षी काही जागा रिक्त राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या अधिकृत आकडेवारीनुसार ३१ एनआयटीमधील ३ हजार ३३४ जागा रिक्त राहिल्या होत्या.

आयआयटी, एनआयटीमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी देशभरातील विद्यार्थ्यांची झुंबड उडते. यासाठी लाखो विद्यार्थी जेईई परीक्षेसाठी कठोर मेहनतही करतात. मात्र, विद्यार्थ्यांनी एवढा आटापिटा करूनही येथील जागा रिक्त राहत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही आयआयटीला असते. त्यापाठोपाठ विद्यार्थी एनआयटीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करतात. देशभरातील ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये ८ हजार ५० पदवी अभ्यासक्रमाच्या जागांसाठी प्रवेश घेतले जातात. बहुतांश एनआयटीमध्ये पहिल्या फेरीमध्ये बहुतांश प्रवेश पूर्ण होतात.

हेही वाचा - कोल्हापुरच्या वीर पुत्राला अखेरचा सलाम -

मात्र, शेवटच्या फेरीनंतर शेकडो जागा रिक्त राहत असल्याचे चित्र आहे. २०१९च्या अधिकृत आकडेवारीनुसार ३१ एनआयटीमधील ३ हजार ३३४ जागा रिक्त राहिल्या आहेत. यात देशात सर्वाधिक प्रवेश क्षमता असलेल्या रायपूर येथील एनआयटीमध्ये १६१ जागा रिक्त होत्या. याप्रमाणे उपराजधानीतील व्हीएनआयटीमध्ये ९४, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आगरतळा २९५, कुरुक्षेत्र-९०, श्रीनगर-२२७, जालंधर- १९८, दिल्ली- ६८ जागा रिक्त होत्या.

"एनआयटीच्या जागा रिक्त राहणे, हे दुर्दैवी आहे. रिक्त जागाची माहिती जाहीर केल्यास तेथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतील."

- दीपक शेटे, तज्ज्ञ शिक्षक

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for this year also the seat of NIT also empty in kolhapur