ब्रेकिंग - पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 

Youth suicide attempt in kolhapur rankal
Youth suicide attempt in kolhapur rankal

कोल्हापूर - बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती घालून करवीर पोलीस ठाण्यातील काही पोलिसांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप करत कळंबा (ता. करवीर) येथील तरूणाने आज दुपारी थेट रंकाळ्यात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने पोलीस व अग्निशामक दलाची चांगलीच तारांबळ उडाली. अग्निशामक दलाने सतर्कता दाखवत त्या तरुणाला वेळीच पाण्याबाहेर काढले. सुनील शांताराम बागम (वय 38, रा. कात्यायनी कॉम्पलेक्‍स, कळंबा) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळाली माहिती, दोन दिवसापूर्वी बागम यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयासह वरिष्ठांकडे तक्रार अर्ज दिला होता. यात करवीर पोलिस ठाण्यातील कर्मचारी बर्गे यांच्यासह चौघांवर आरोप केले होते. कोरोना लॉकडाऊमधील मार्च महिन्यात बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून 50 हजार रुपयांची लाचेची मागणी व पोलिस ठाण्यात डांबून मारहाण केली गेली असे आरोप अर्जात केले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करा अशी मागणी करत त्यांनी आज दुपारी रंकाळ्यात उडी घेऊन "जल समाधी' घेणार असल्याचे म्हटले होते. 

त्यामुळे सकाळपासून संध्यामठ ते शालिनी पॅलेस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अग्निशामक दलही सर्व तयारीनिशी रंकाळ्याजवळ तैनात होते. बागम यांनी पोलिसांना चकवा देत दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पळत जावून थेट रंकाळ्यात उडी घेतली. पण त्यांना अग्निशामक दलाने बोटीच्या साह्याने वेळीच बाहेर काढले. सकाळपासून या परिसरात असलेल्या बंदोबस्तामुळे व अग्निशामक दलाच्या उपस्थितीमुळे भागात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. 
 
अग्निशामक दलासह पोलिसांची सतर्कता... 
रंकाळ्यात उडी घेऊन जल समाधी घेणाऱ्या सुनील बागम यांना वाचविण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या, रेस्क्‍यू व्हॅन, एक बोट घेऊन जवान रंकाळ्याबाहेर तैनात होते. संध्यामठ ते शालीनी पॅलेस रस्त्यावर जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
 
यांनी दिले जीवदान... 
अग्निशामक दलाचे स्थानक अधिकारी दस्तगिर मुल्लासह उमाजी निकम, सुनील वाईंगडे, प्रमोद मोरे, गिरीष गवळी, श्रीधर चाचे, अक्षय पाटील यांनी बोटीच्या मदतीने बागम यांना सुरक्षीत पाण्याबाहेर काढले. त्याच्या या कामात त्यांना पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचारी प्रदीप पाटील, योगेश गोसावी, सचिन देसाई, प्रदीप पाटील, विशाल शिरगांवकर आदींनी मदत केली. 
 
अर्जात चौघांचा उल्लेख 
विशेष पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे बागम यांनी आरोपा संबधी दिलेल्या अर्जात करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सहायक फौजदार चंद्रकांत भोसले, कर्मचारी राजाराम बर्गे व शिंदे या चौघांच्या नावांचा उल्लेख आहे. 

 
संबधित अर्जासह सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना देण्यात आले आहेत. 
-डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com