जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक करतो महापालिका शाळांचे सॅनिटायझेशन

teacher.png
teacher.png

कोल्हापूर ः कोरोना काळात माणसं माणसांपासून लांब होत गेली. बाधित असल्याच्या संशयावरून काही ठिकाणी काही लोकांना दगड मारून परिसरातून बाहेर काढण्याचे प्रकारही घडले. पण, आता महापालिकेच्या सर्व शाळांचे स्वखर्चाने सॅनिटायझेशन करण्याचा संकल्प एका शिक्षकाने केला आहे आणि विशेष म्हणजे हा शिक्षक "झेडपी'च्या शाळेतील आहे. हेरले (ता. हातकणंगले) येथील व्दारकानाथ भोसले असं या शिक्षकाचे नाव. गेल्या एका महिन्यात त्यांनी महापालिकेच्या चार शाळांचे सॅनिटायझेशन पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे सॅनिटायझेशनही ते करणार आहेत. 
जिल्हा परिषद शिक्षक म्हणून श्री. भोसले 2002 साली रुजू झाले. ते सध्या पुलाची शिरोली येथील कुमार विद्यामंदिर शाळेत कार्यरत आहेत. ज्ञानरचनावादी शिक्षणाची संकल्पना पुढे आली आणि त्यानिमित्त होणाऱ्या विविध प्रशिक्षण, कार्यशाळांच्या निमित्ताने महापालिका शिक्षक व शाळांशी त्यांचा सातत्याने संपर्क येऊ लागला. त्यातून महापालिका शाळेतील मुलांसाठी ते विविध प्रकारची मदत करू लागले. गेली सात महिने सर्वच शाळा बंद आहेत. मात्र, त्या पुन्हा सुरू होण्यापूर्वी शाळेतील प्रत्येक वर्गाचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. पण, ते करणार कोण आणि त्याच्या खर्चाचे काय, असे अनेक प्रश्‍न होते. श्री. भोसले यांनी स्वतःच पुढाकार घेतला आणि अठ्ठावीसशे रुपयांचा पंप विकत घेतला. पीपीई किटसह सॅनिटायझेशनसाठी लागणारे साहित्य स्वतःच खरेदी केले. साळोखेनगर, सुभाषनगर, वीर कक्कया, नेहरूनगर अशा एकेक शाळा सॅनिटाईज होऊ लागल्या आणि त्यांच्या या उपक्रमाची माहिती मिळताच त्यांना साहित्याची मदत विविध शाळांतील शिक्षकांनी सुरू केली. महापालिका शिक्षण मंडळ, शिक्षकांच्या विविध संघटनांनीही त्यांनी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली आहे. 


आई मनीषा भोसले शिक्षिका. त्यांनी सतत विद्यार्थी व शाळांसाठी प्रयोगशील उपक्रम राबवले. त्यांचीच प्रेरणा घेऊन मी माझ्या हातून "झेडपी' व महापालिका शाळांसाठी शक्‍य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. 
- व्दारकानाथ भोसले

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com