...तर महावितरणने कंत्राटदारांना टाकावे काळ्या यादीत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

एक गाव-एक दिवस उपक्रम राज्यात राबवा 
महावितरणच्या बारामती परिमंडळाच्यावतीने एक गाव-एक दिवस उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे कौतुक करुन तो राज्यभर राबविण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या. त्याचबरोबर ग्राहकांना वीजपुरवठ्याबाबतची माहिती एसएमएसद्वारे मिळालीच पाहिजे. देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याची पूर्वसूचना असेल किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची ग्राहकांना पूर्वसूचना न मिळाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सोलापूर ः सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्यभरात कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांकडून तत्परतेने किंवा आवश्‍यकतेनुसार समाधानकारक कामे होत नसल्यास किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी वाढत असल्यास अशा कंत्राटदारांविरुद्ध ताबडतोब कारवाई करुन त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा. थकबाकी वसुलीसाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. 

पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री राऊत यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे उपस्थित होते. उन्हाळ्यामुळे अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधीत जबाबदार व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. वेळ पडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. या कॉन्फरन्समध्ये महावितरणचे संचालक गोविंद बोडके, दिनेशचंद्र साबू, भालचंद्र खंडाईत, पी. के. गंजू, स्वाती व्यवहारे, अंकुश नाळे, सुनील पावडे, सचिन तालेवार, अंकुर कावळे उपस्थित होते. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... MSEDCL should blacklist contractors