खेलो इंडिया ! सोलापूर विद्यापीठाच्या मल्टिपर्पज इनडोर हॉलसाठी साडेचार कोटी मंजूर 

तात्या लांडगे 
Wednesday, 28 October 2020

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी भारत सरकारच्या खेलो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टिपर्पज इनडोर हॉल निर्माण करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी भारत सरकारच्या खेलो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टिपर्पज इनडोर हॉल निर्माण करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. 

मागील दीड वर्षापूर्वी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून केंद्र सरकारकडे खेळाडूंसाठी मल्टिपर्पज हॉल आणि स्वीमिंग टॅंककरिता प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्य शासनाची परवानगी घेऊन सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाकडे देण्यात आला होता. खेलो इंडिया अभियानातून हा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे. विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात विद्यार्थी खेळाडूंसाठी हा मल्टिपर्पज हॉल उभारला जाणार आहे. 

गेल्या दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. सोमवारी (ता. 26) निधी मंजुरीचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले आहे. क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस. के. पवार यांनी प्रस्ताव तयार केला होता. खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनीही प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न केले आहेत, असेही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. 

या मल्टिपर्पज हॉलमध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्‍सिंग, हॅंडबॉल, ज्यूदो, कबड्डी, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस यासह विविध प्रकारचे 15 खेळ खेळता येणार आहेत. जागतिक दर्जाचे अगदी सुसज्ज असे मल्टिपर्पज हॉल उभारले जाणार असल्याचे क्रीडा संचालक डॉ. पवार यांनी सांगितले. 

सोलापूरच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी खूप चांगले हॉल उपलब्ध होणार आहे. याचा फायदा निश्‍चितच येथील विद्यार्थी खेळाडूंच्या उज्ज्वल करिअरसाठी होईल, असा विश्‍वास कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी व्यक्त केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4.5 crore sanctioned for multipurpose indoor hall of Solapur University