कापड व्यवसायात 500 कोटींची उलाढाल ठप्प!

 500 crore turnover in textile business stalled!
500 crore turnover in textile business stalled!

सोलापूर : लॉकडाउनमुळे येथील गारमेंट उद्योग 22 मार्चपासून बंद आहे. त्यामुळे या उद्योगाला लागणाऱ्या युनिफॉर्म कापडांना मागणी नाही. तसेच लग्नसराई, आंबेडकर जयंती व रमजान ईद असे महत्त्वाचे सणही लॉकडाउनमुळे उत्साहात व सामुदायिकरीत्या साजरे न झाल्यामुळे फॅन्सी कपडे, विविध ड्रेस मटेरिअल आदी कापडांनाही मागणी नसल्यामुळे शहरातील कापड व्यवसायातील जवळपास 500 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती कापड व्यापाऱ्यांनी दिली.


दरवर्षी दिवाळीनंतर शाळा-महाविद्यालयांकडून गारमेंट उत्पादकांकडे युनिफॉर्मची मागणी नोंदवली जाते. त्याप्रमाणे गारमेंट उत्पादक कापड व्यापाऱ्यांकडे कापडाची मागणी नोंदवतात. या वर्षीही कापड व्यापाऱ्यांकडे कापडाची मागणी नोंदवली गेली. व्यापाऱ्यांनीही ऑर्डरप्रमाणे देशातील विविध नामांकित फॅक्‍टऱ्यांकडून कापड मागवून स्टॉक ठेवला आहे. फेब्रुवारीपासून युनिफॉर्म तयार करण्याच्या कामाला सुरवात होते. मात्र, लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून गारमेंट उद्योग बंद आहेत. त्यामुळे युनिफॉर्मच्या कापडाला अद्यापही मागणी नाही. 


लॉकडाउनच्या दरम्यान लग्नसराई व रमजान ईदचा सीझन हातून गेला. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी ठराविक रंगांच्या युनिफॉर्मची मागणी असते. लग्नसराई, रमजान ईद व आंबेडकर जयंतीसाठी फॅन्सी कापड, ड्रेस मटेरिअल, साड्या आदींचा स्टॉक ठेवून व्यापाऱ्यांनी सीझनची तयारी केली होती. मात्र, कोट्यवधींची गुंतवणूक करूनही एक मीटर कापडाचीही विक्री झाली नसल्यामुळे अनेक कापड व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. त्यात छोट्या व्यापाऱ्यांसमोर खूपच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. 


एकूणच युनिफॉर्मसाठी लागणाऱ्या पीव्ही व पीसी तसेच लग्नसराई व इतर सणांसाठी लागणाऱ्या फॅन्सी कापडाची मुंबई, सुरत, भिलवाडा, अहमदाबाद, इचलकरंजी आदी शहरातील मोठ्या कंपन्यांकडून कापड मागवून ठेवले आहे. मात्र, विक्रीअभावी गोदामात पडून आहे. 

गारमेंटवर व्यापारी आशावादी 
आज ना उद्या कापड दुकाने सुरू करण्याची परवानगी प्रशासन देईल; मात्र गारमेंट उद्योग बंद राहिल्यास खरेदी करणार कोण, असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे कोरोनाचे नैसर्गिक संकट आज ना उद्या टळेल, गारमेंट उद्योग सुरू होतील व निदान 50 टक्के कापडाची तरी मागणी गारमेंट उत्पादकांकडून होईल, अशी आशा शहरातील 35 ते 40 होलसेल व 600 ते 700 रिटेल व्यापाऱ्यांना लागून राहिली आहे. काही व्यापाऱ्यांनी या वर्षीचा युनिफॉर्म सीझन संपल्यातच जमा असल्याची भीती व्यक्त केली. 

लॉकडाउनमुळे मागणीच नाही
गारमेंट उत्पादकांकडून विविध रंग व डिझाईनच्या कापडांची मागणी होती. त्यानुसार कापड मागवून स्टॉक ठेवला आहे. मात्र, लॉकडाउनमुळे मागणीच नाही. पीपीई किट व मास्कच्या कापडाला तेवढीच मागणी आहे. गारमेंट उद्योग सुरू झाल्यास व्यापार पुन्हा रुळावर येण्याची आशा आहे. 
- विजय डाकलिया, कापड व्यापारी 

खूप मोठे नुकसान
कोरोनामुळे मागील सीझनमध्ये विकलेल्या मालाचे पैसेसुद्धा थकीत राहिले व सध्याची परिस्थिती अशी आहे, की मागूही शकत नाही. या वर्षी चांगला व्यवसाय होईल म्हणून कापडाचा स्टॉक ठेवला मात्र विक्री एक रुपयाची नाही. आम्हा छोट्या व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. 
- अशोक कोचर, कापड व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com