"अतिवृष्टीत' सोलापूर जिल्ह्याचे 935 कोटींचे नुकसान, पालकमंत्री भरणे : मदतीसाठी शासनाला पाठविला अहवाल 

प्रमोद बोडके
Friday, 30 October 2020

  • नुकसानीची ठळक आकडेवारी 
  • कृषी, महसूल : 488 कोटी 
  • जिल्हा परिषद : 232 कोटी 
  • सार्वजनिक बांधकाम रस्ते व पूल : 78 कोटी 
  • जलसंपदा विभाग : 40 कोटी 
  • जिल्हा परिषद जलसंधारण : 27 कोटी 
  • महापालिका हद्दीतील : 19 कोटी 
  • महावितरण : 6 कोटी 
  • ग्रामीण पाणी पुरवठा : 5 कोटी 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 935 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून जास्तीत जास्त मदत करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 

नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशिय सभागृहात बैठक घेतली. जिल्हाधिकारी बहुउद्देशिय सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शेती, रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलसंपदा विभागाकडील नुकसान यांची एकत्रित माहिती घेतली असता हे नुकसान सुमारे 935 कोटी 28 लाख रुपयांचे असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सर्वांकश अहवाल शासनास पाठविण्यात आला असून जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवीद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अधीक्षक अभियंता सतोष शेलार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिल ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. दुधभाते आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 935 crore loss to Solapur district due to 'heavy rains', Report sent to Govt for help