खासगी शाळांच्या फी वसुलीविरोधात "आम आदमी' चा एल्गार 

Aam Admi Party Solapur
Aam Admi Party Solapur

दक्षिण सोलापूर ः शिक्षणाचा अधिकार अधिनियमातून (आरटीई) प्रवेश घेतलेल्या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून शाळांना मिळत असताना सोलापुरातील काही खासगी शाळा या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पुन्हा शुल्क वसूल करीत असल्याने आम आदमी पार्टीने पालक युनियनची स्थापना करत त्याविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष खतीब वकील यांनी बुधवारी (ता.16) पत्रकार परिषदेत दिली. 

खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षणाचा अधिकार अधिनियमातून (आरटीई) 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला -मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. 
ह्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शाळेची फी हि शासना कडून शाळेंना देण्यात येते. परंतु सोलापुरातील काही खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून हि फी शाळा वसूल करीत आहेत अशा तक्रारी आम आदमी पार्टीला प्राप्त झाल्या. यावरून असे निदर्शनास आले आहे, की आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून शाळा कुठलेही कारण सांगून फी वसूल करीत आहेत. पालकांनी फी भरायची आवश्‍यकता नाही असे म्हणताच शाळेकडून त्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून मध्येच काढले जाते, शाळेच्या इतर ऍप्लिकेशनचे पासवर्ड दिले जात नाहीत. 

एका बाजूने शासन ह्या विद्यार्थ्यांची फी शाळांना देत आहे आणि दुसऱ्या बाजूनी शाळा विद्यार्थ्यां कडून ही फी वसूल करीत आहे, ही बाब खेदास्पद आहे. आरटीई सुविधेचा शाळाकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसते. कोरोना काळात जे पालक फी भरू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना शाळा ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देत नाही. फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक जमा करून घेतले जाणार नाही असे सांगितले जात आहे. अश्‍या बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत. या सर्वाचे निवारण करण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टीने पालक युनियनची स्थापना केली आसल्याचे खतीब यांनी सांगितले. 

आपच्या विद्यार्थी व शिक्षण समितीचे अध्यक्ष रॉबर्ट गौडेर हे ह्या युनियनचे अध्यक्ष राहणार आहेत. सोलापुरातील खासगी शाळां कडून होत असलेल्या ह्या त्रासाबद्दल पालक व आम आदमी पार्टी तर्फे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांना चार वेळा तक्रारी अर्ज देण्यात आले. त्या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी ठोस पाऊल न उचलता, मोघम उत्तरे दिली. शिक्षण संस्थांची योग्य चौकशी न करताच अहवाल देण्यात आला. पालकांच्या एकाही शंकेचे निरसन शिक्षणाधिकारी यांच्याकडून झालेले नाही. उलट पालकांनाच शिक्षण संस्थेकडे जाऊन तुम्ही तुमचे बघून घ्या,अशी उत्तरे देण्यात आली. पालकांनी शिक्षण संस्थेत जाऊन याबद्दल विचारणा केली असता,त्यांना शाळेच्या प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. 

वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांनी मागितल्या प्रमाणे सर्व पालकांच्या तक्रारी, शाळेमार्फत आलेले रेकॉर्डिंग कॉल तसेच पालकांनी भरलेल्या फीचे पुरावे देऊन सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता पालकांच्या तक्रारी अर्जाची दखल घेतली नाही. त्यामुळे आता आम आदी पार्टी लढा तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले. आरटीई प्रवेश घेतलेल्या सर्व पालकांनी आम आदमी पार्टी पालक युनियनचे अध्यक्ष रॉबर्ट गौडेर (मो.9922022117) ह्यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. 

या पत्रकार परिषदेसाठी शहराध्यक्ष अस्लम शेख, सागर पाटील, रॉबर्ट गौडेर, ज्योती गायकवाड, रहीम शेख, सुनीता गौडर, असिफ शेख, पूजा गायकवाड, आनंद जाधव आदी उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com