उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी घातले विठ्ठल चरणी साकडे 

भारत नागणे 
Tuesday, 27 October 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकर कोरोनामुक्त होऊन घरी यावेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, असे साकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज श्री विठ्ठल चरणी घातले. 

पंढरपूर (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकर कोरोनामुक्त होऊन घरी यावेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, असे साकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज श्री विठ्ठल चरणी घातले. 

अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सौम्य लक्षणे असली तरी त्यांना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अजित पवार यांनीच सांगितले आहे. त्यानंतर आज पंढरपूर येथील शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप मांडवे व त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पाशांकुशा एकादशीचे औचित्य साधून संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाची पूजा केली. या वेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार लवकर बरे व्हावेत आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सक्रिय व्हावेत, असे विठ्ठल - रुक्‍मिणी चरणी साकडे घातले. 

विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यासाठीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठलाला साकडे घातले. या वेळी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष संदीप मांडवे, शहर संघटक विजय मोरे, सचिव सागर कवडे, सुमीत शिंदे, उपाध्यक्ष दादा थिटे, उपाध्यक्ष विशाल डोंगरे, रामचंद्र खडके यांच्यासह सर्व राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Activists pray to Vitthal for longevity of Deputy Chief Minister Ajit Pawar