वैरागच्या मयूर वाणीच्या अभिनयाचे होतेय कौतुक ! "बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मध्ये "मगदूम'च्या भूमिकेत 

कुलभूषण विभूते 
Tuesday, 22 December 2020

मयूर वाणी हा वैराग (ता. बार्शी) येथील असून, त्याने या आधीही मालिकांमध्ये काम केले आहे. "बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत 27 वर्षे वय असलेला मयूर 57 वर्षाच्या "मगदूम' या वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारत आहे. आदमपूर येथे बाळूमामाचे वंशज राहात असून मगदूम ही कथा सत्य घटनेवर चित्रित केली आहे. मयूरच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. 

वैराग (सोलापूर) : जिल्ह्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. काही कलाकार टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये झळकत आहेत. असाच वैराग (ता. बार्शी) येथील मयूर राजेंद्र वाणी हा युवक अभिनेता म्हणून अनेक मालिकांतून विविध पात्रे साकारत आहे. सध्या तो "बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत "मगदूम'ची प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आणि ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, प्रेक्षकांच्या पसंतीचा तो ताईत बनला आहे. 

मयूर वाणी हा वैरागचा असून त्याने या आधीही मालिकांमध्ये काम केले आहे. "बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत 27 वर्षे वय असलेला मयूर 57 वर्षाच्या "मगदूम' या वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारत आहे. आदमपूर येथे बाळूमामाचे वंशज राहात असून मगदूम ही कथा सत्य घटनेवर चित्रित केली आहे. मयूरच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मामाच्या वंशजांनी थेट सेटवर येऊन त्याचे खास कौतुक केले. ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

मयूर वाणी हा वैरागसारख्या ग्रामीण भागातील असून, घरची कुठलीही फिल्मी पार्श्वभूमी नाही. त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने या आधी नाटकांतून सुरवात केली आहे. नाट्य लेखन, शॉर्ट फिल्म तसेच संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, एक होती राजकन्या, सावित्रीज्योती, सुख म्हणजे नक्की काय असतं यांसारख्या मालिकांमधून काही पात्रे साकारली आहेत. त्याच्या या यशस्वी भूमिकेबद्दल संपूर्ण राज्यातील प्रेक्षकवर्ग कौतुक करताना दिसत आहे. 

परिस्थितीवर मात करून तो अभिनेता बनला. त्याने साकारलेल्या भूमिका पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद वाटतो, असे उद्‌गार मयूरचे वडील राजेंद्र वाणी यांनी काढले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Mayur Vani from Vairag is appreciated for his acting