
शुक्रवारी होणाऱ्या मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महसूल व पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, महसूल प्रशासनाने एकूण 1604 कर्मचारी तर मोहोळ व कामती पोलिस ठाणे प्रशासनाने एकूण 350 पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर व कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.
मोहोळ (सोलापूर) : शुक्रवारी होणाऱ्या मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महसूल व पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, महसूल प्रशासनाने एकूण 1604 कर्मचारी तर मोहोळ व कामती पोलिस ठाणे प्रशासनाने एकूण 350 पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर व कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींसाठी येत्या उद्या (शुक्रवारी) मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया निर्विघ्न व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. गाव पातळीवरील ही निवडणूक असल्याने यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. मोहोळ पोलिस प्रशासनाने उपविभागीय पोलिस अधिकारी 1, सहाय्यक पोलिस निरीक्षक 6, पोलिस उपनिरीक्षक 2, पोलिस निरीक्षक 1, मतदान केंद्राच्या बंदोबस्तासाठी 111 पोलिस कर्मचारी तर 125 होमगार्ड असा बंदोबस्त लावला आहे. संवेदनशील नऊ ठिकाणी पोलिस पॉईंट तैनात केले आहेत तर सात ठिकाणी सेक्टर पेट्रोलिंग सुरू राहणार आहे.
कामती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण 16 गावे असून त्या ठिकाणी 58 मतदान केंद्रे आहेत. त्या ठिकाणची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस निरीक्षक 1, सहाय्यक पोलिस निरीक्षक 1, पोलिस उपनिरीक्षक 4, पोलिस कर्मचारी 55 व होमगार्ड 43 असे एकूण 104 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
महसूल प्रशासनाने मतदान केंद्राध्यक्ष 246, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष 246, मतदान अधिकारी एक व दोन 492, शिपाई 246, केंद्राध्यक्ष राखीव 40, सहाय्यक केंद्राध्यक्ष 40, सहाय्यक केंद्राध्यक्ष राखीव 108, मतदान अधिकारी 1 व 2 राखीव 145, शिपाई राखीव 81 असे एकूण 1604 कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदान पेट्यांची व यंत्रांची ने- आण करण्यासाठी एकूण 38 राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या ताब्यात घेतल्या आहेत, तर 20 खासगी वाहने ताब्यात घेतली आहेत. मतदान प्रक्रिया कशी पार पडावी यासाठी कर्मचाऱ्यांना दोन प्रशिक्षणे देण्यात आली आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर वाटपासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके नेमल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर यांनी दिली.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल