कल्याणराव काळे व मी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवार म्हणून एकच : आमदार भालके 

Bharat Bhalke
Bharat Bhalke

पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह विठ्ठल परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त केली. 

अलीकडेच शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. माजी आमदार सुधाकर परिचारक, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची श्री. पवारांनी सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप नेते कल्याणराव काळे यांना श्री. पवारांच्या भेटीसाठी तिष्ठत थांबावे लागले होते. श्री. काळेंना तर चक्क पोलिसांनी प्रवेश नाकारल्याने ते परत गेले होते. शेवटी त्यांनी हेलिपॅडवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये याविषयी चांगलीच चर्चा झाली होती. 

श्री. पवारांच्या दौऱ्यानंतर आठ दिवसांनी आमदार भारत भालके यांनी माध्यमांना प्रेस नोट पाठवली आहे. कल्याणराव काळे हे भाजपत असले तरी आम्ही विठ्ठल परिवार म्हणून एकच आहोत, असा खुलासा करत, मी स्वतः कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष विजयसिंह देशमुख, विठ्ठल सूत गिरणीचे अध्यक्ष दिनकर पाटील यांची त्याच वेळी दिलगिरी व्यक्त केली होती, असेही त्यांनी या प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे. 

पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर आल्यानंतर आमदार भालकेंनी यामध्ये राजकारण केले जात असल्याचे सांगत माध्यमांवर याचे खापर फोडले आहे. प्रसे नोटमध्ये आमदार भालके म्हणतात, की आदरणीय पवार साहेबांच्या दौऱ्यामध्ये भोसे येथे आमदार भारत भालके उपस्थित होते, ही बाब लिहिणाऱ्यालाच कशी योग्य वाटली? कारण आदरणीय पवार साहेब हे आमचे नेते असून मी स्थानिक लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी स्वतः त्यांच्या दौऱ्याचे नियोजन केलेले होते. त्यामुळे मी आदरणीय पवार साहेबांबरोबर संपूर्ण दौऱ्यामध्ये असणे ही माझी जबाबदारी होती. पवार साहेबांच्या दौऱ्यामध्ये पंढरपूर येथील माझ्या निवासस्थानी जेवणासाठी मी विनंती केलेली होती. भोसे येथे मी स्वतः कल्याणराव काळे यांना जेवणासाठी निमंत्रण दिलेले होते. कल्याणराव काळे हे जरी भाजपत असले तरी ते आमच्या विठ्ठल परिवारातील एक ज्येष्ठ सहकारी आहेत. 

दौऱ्यामध्ये जिल्ह्यातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची यादी पोलिस खात्याने मागवून घेतली होती. तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांची यादी दिलेली नव्हती. मी स्वतः साहेबांबरोबर असल्यामुळे माझे काही सहकारी माझ्या निवासस्थानाच्या बाहेर राहिले. त्यामध्ये कल्याणराव काळे, दिनकरबापू पाटील, विजयसिंह देशमुख यांची मी स्वतः दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्यामुळे विनाकारण चांगलं फाडून वाईट बघण्याचा कोणी प्रयत्न करू नये. या सर्वांना पोलिसांनी सोडले नसल्यामुळे ते घराजवळून निघून गेल्याचे मला समजल्याबरोबर या सर्वांना मी साहेबांसमोरच पुन्हा फोन करून साहेबांना भेटण्यासाठी विनंतीही केली होती. त्यामुळे गैरसमज करू नये. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात एकत्र आहोत, असेही आमदार भालकेंनी स्पष्ट केले आहे. 

शरद पवारांच्या दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांमधील नाराजीसंदर्भात आमदार भालकेंनी खुलासा केल्यानंतर कल्याणराव काळे याविषयी काय बोलतात, याकडेच आता लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com