वीजबिल माफीसाठी पंढरपुरात मनसेचे आंदोलन ! वीज अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून केला निषेध 

भारत नागणे 
Wednesday, 20 January 2021

घरगुती वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आज (बुधवारी) राज्यभरात सरकार आणि वीज कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. पंढरपुरातही आंदोलनाचे पडसाद उमटले. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून अनोखे आंदोलन केले. 

पंढरपूर (सोलापूर) : घरगुती वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आज (बुधवारी) राज्यभरात सरकार आणि वीज कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. पंढरपुरातही आंदोलनाचे पडसाद उमटले. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून अनोखे आंदोलन केले. 

कोरोना महामारीमुळे अनेकांचे नोकरी, उद्योग व व्यवसाय धोक्‍यात आले. अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले होते. अर्थार्जनाची साधने हातची गेल्याने नागरिक हतबल झाले. अशा वेळी राज्य शासनाने मध्यंतरी लॉकडाउन काळातील वीज बिलमाफी केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र वीज बिलमाफी शक्‍य नसल्याचे राज्य शासनाने जाहीर केले. शासनाच्या अशा भूमिकेमुळे वीज ग्राहक संभ्रमात पडले आहेत. 

अशातच मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना महामारीच्या काळातील थकीत वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यातच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही वीज बिल भरा, अन्यथा वीज तोडणीच्या कारवाईला सामोरे जा, असे स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आज (बुधवारी) वीज ग्राहकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी व ग्राहकांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले. निवेदन घेण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वीज अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून अनोखे आंदोलन केले. 

या वेळी कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व वीज वितरण कंपनीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारले. या वेळी आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अनिल बागल, जिल्हा संघटक सागर बडवे, शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी, शुभम धोत्रे, प्रथमेश धुमाळ आदींसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An agitation was organized by MNS in Pandharpur for electricity bill waiver