अक्कलकोट तालुका : 27 पेक्षा जास्त धार्मिक व निसर्ग पर्यटन स्थळांचे वैभव

राजशेखर चौधरी 
Friday, 18 September 2020

अक्कलकोट तालुक्‍यात धार्मिक पर्यटन स्थळे खूप आहेत, ज्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, विश्व फाउंडेशन (शिवपुरी), श्री स्वामी समर्थ समाधी मठ, गुरू मंदिर, राजेराय मठ, खंडोबा देवस्थान, श्री स्वामी समर्थ विश्रांती धाम (बागेहळ्ळी), हक्‍या मारुती मंदिर, श्री शेख नुरुद्दीन बाशा दर्गाह, संस्थानकालीन शस्त्रागार, श्री काशीविश्वेश्वर देवस्थान (जेऊर), श्री जागृत मारुती मंदिर (गौडगाव), लक्ष्मी तोफ, मुरलीधर मंदिर, सैफुल मुलक दर्गाह (हैद्रा), कुरनूर धरण येथील निसर्ग पर्यटन आदी बाबींचा समावेश आहे. 

 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुका हा अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांचे वैभव असलेला तालुका आहे. या ठिकाणी एकूण 27 पेक्षा जास्त विविध धार्मिक, नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. सध्या कोरोनाच्या साथीने धार्मिक ठिकाणे दर्शनासाठी बंद असली तरी आता हळूहळू एकेक गोष्टी सुरू होत आहेत. आता आंतरराज्य बससेवा सुद्धा काही प्रमाणात सुरू होत आहेत. येत्या काळात जेव्हा धार्मिक स्थळे उघडतील तेव्हा कोरोनाच्या भीतीने घरी राहिलेले पर्यटक व निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतील तेव्हा अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर व इतर धार्मिक स्थळे तसेच नैसर्गिक अधिवास असलेले कुरनूर धरण गर्दीने फुलून जाऊन नागरिक पूर्वीच्या सुखद गोष्टी निश्‍चितच पुन्हा अनुभवू शकतील, यात संदेह नाही. 

Image may contain: night
नवीन राजवाडा

अक्कलकोट तालुक्‍यात धार्मिक पर्यटन स्थळे खूप आहेत, ज्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, विश्व फाउंडेशन (शिवपुरी), श्री स्वामी समर्थ समाधी मठ, गुरू मंदिर, राजेराय मठ, खंडोबा देवस्थान, श्री स्वामी समर्थ विश्रांती धाम (बागेहळ्ळी), हक्‍या मारुती मंदिर, श्री शेख नुरुद्दीन बाशा दर्गाह, संस्थानकालीन शस्त्रागार, श्री काशीविश्वेश्वर देवस्थान (जेऊर), श्री जागृत मारुती मंदिर (गौडगाव), लक्ष्मी तोफ, मुरलीधर मंदिर, सैफुल मुलक दर्गाह (हैद्रा), कुरनूर धरण येथील निसर्ग पर्यटन आदी बाबींचा समावेश आहे. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराज यांचे वास्तव्य आणि समाधी स्थान ता दोन महत्त्वपूर्ण धार्मिक गोष्टी आहेत. यासोबतच आणखी 27 अनेक धार्मिक व ऐतिहासिक वास्तूही या ठिकाणी दर्शन व पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात जुना राजवाडा आहे तर बस स्थानकाजवळ नवीन राजवाडा मोठ्या दिमाखात संस्थानकालीन वारसा जपत उभा आहे. त्यात मौल्यवान शस्त्रागार आहे. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्‌गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हाडी, बंदुका, खंजीर आदी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. 

No photo description available.
शिवस्मारक

शिवपुरीचे अग्निहोत्र केंद्र 
वैश्विक परिवर्तनासाठी अग्निहोत्र केंद्र (शिवपुरी). अक्कलकोटपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिवपुरीला विश्व परिवर्तन व कल्याणासाठीच्या अग्निहोत्राचे जागतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. 165 वर्षांची परंपरा असलेल्या या कार्याला डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आज पुढे नेत आहेत. अग्निहोत्र एकूण 68 देशांत केले जाते. शिवपुरी येथे अग्निहोत्रावर आधुनिक विज्ञानावर आधारित अनेक यशस्वी प्रयोग करून ते प्रसिद्ध केले जातात. 

No photo description available.
शस्त्रागार नवीन राजवाडा

इतर पर्यटन स्थळे 
अक्कलकोट येथील ध्यानाचे स्थान असलेला श्री स्वामी समर्थ समाधी मठ, निर्मलाराजे कन्या प्रशालेसमोर असलेला संस्थानकालीन संदेश देण्यात उपयुक्त ठरलेला लक्ष्मी तोफ, जोशी बुवा मठ तसेच हक्‍याचा मारुती मंदिर ही सर्व धार्मिक स्थळे प्रेक्षणीय आहेतच, याशिवाय श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेला सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेला शेख नुरुद्दीन बाशा दर्गाह आणि त्याशेजारचे असलेले अक्कलकोटला अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारे संस्थानकालीन हत्ती तलाव हे सुद्धा येथे आहे. बस स्थानकासमोर असलेले श्री खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे आणि कारंजा चौकातील तारामाता उद्यानातील खास इंग्लंडवरून मागविलेले दोन कारंजे होते. त्यातील एक चोरीला जाऊन एकच शिल्लक राहिला आहे. याशिवाय आता बोरी नदीवरील कुरनूर धरण परिसर हे एक राष्ट्रीय पक्षी निरीक्षण केंद्र होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या अशा एक ना अनेक धार्मिक व ऐतिहासिक घटनांनी गजबजलेले अक्कलकोट शहर हे भाविकांसाठी मेजवानीच आहे. 

No photo description available.
अन्नछत्र मंडळ महाप्रसादगृह

अन्नछत्र, शिवसृष्टी वैशिष्ट्यपूर्ण 
अक्कलकोट शहरात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना जन्मेजयराजे भोसले यांनी केली असून, त्याची स्थापना 1988 मध्ये झाली. त्यात आता सरासरी पंधरा हजारपेक्षा जास्त भाविक दररोज महाप्रसाद घेऊन तृप्त होत आहेत. तसेच अन्नछत्र मंडळ प्रांगणात शिवसृष्टी उभारण्यात आली असून त्यासमोर नयनरम्य कारंजेसुद्धा आहेत. याच ठिकाणी ताम्रपटावर कोरीव केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनपट रेखाटलेले आहे. त्याला लागूनच बालगोपाळांसाठी खेळ साहित्य, सुंदर बाग, संगीतमय कारंजे निर्माण करून भाविकांची खूप मोठी सोय करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akkalkot taluka is a place of religious and nature tourism