अमेरिका, पाकिस्तानला जे हवयं...ते मिळणार सोलापुरात

प्रमोद बोडके
Friday, 17 April 2020

औषध निर्मिती करणाऱ्या 12 कंपन्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये ऑक्‍सिजन निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांचा समावेश आहे. स्मृती ऑरगॅनिक्‍स लि. या कंपनीला खास बाब म्हणून हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन व प्लेन क्‍लोरोक्विन उत्पादनाची मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात गॅस निर्मिती (नायट्रोजन, कार्बनडाय ऑक्‍साईड व तत्सम) करणाऱ्या कंपन्यांनी ऑक्‍सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. अशा कंपन्यांना खास बाब म्हणून तत्काळ ऑक्‍सिजन निर्मितीची परवानगी दिली जाईल. 
- भूषण पाटील, उपायुक्त, औषध प्रशासन, सोलापूर 

सोलापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या देशातील कोरोना रोखण्यासाठी "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'ची आवश्‍यकता आहे. त्यामुळे विविध राष्ट्रांकडून भारताकडे "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'ची मागणी सातत्याने होऊ लागली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सॅनिटायजर उत्पादनानंतर आता सोलापूर जिल्ह्यात "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'व प्लेन क्‍लोरोक्विनची होणारी निर्मिती सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. 

हेही वाचा - तर पाणी टंचाई निर्माण होऊ शकेल 

हिवतापावरील सर्वात प्रभावी औषध म्हणून भारतात अनेक वर्षांपासून "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'चा प्रभावी वापर केला जात आहे. सोलापूरसह संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली असलेल्या "कोरोना'चा मुकाबला करण्यासाठी सध्या "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन' प्रभावी ठरत आहे. इतर देशांकडून आता भारताकडे "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'ची मागणी वाढू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी एमआयडीसीमधील स्मृती ऑरगॅनिक्‍स लि. कंपनीला "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'च्या उत्पादनाला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त भूषण पाटील यांच्या प्रयत्नातून चार ते पाच दोन दिवसांपूर्वी या कंपनीला "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'व प्लेन क्‍लोरोक्विन उत्पादनाची मान्यता मिळाली आहे. 

हेही वाचा - कोरोनासह "या' समस्येला सामोरे जाण्यासाठी सोलापूरचे प्रशासन सज्ज 

"हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'व प्लेन क्‍लोरोक्विन निर्मितीसाठी आवश्‍यक असलेला कच्चा माल उपलब्ध नसल्याने तत्काळ "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'चे उत्पादन सुरू करण्यास अडचण येऊ लागली आहे. लॉकडाउनमुळे हा कच्चा माल सोलापुरात येऊ शकत नाही. "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'च्या उत्पादनासाठी क्‍लोरो ऍनिलिनसह इतर कच्च्या मालाची आवश्‍यकता आहे. हा कच्चा माल सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'व प्लेन क्‍लोरोक्विनचे उत्पादन सुरू होणार आहे. दिवसाला चार ते पाच टन "हायड्रॉक्‍सी क्‍लोरिक्विन'ची या ठिकाणी निर्मिती होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America, Pakistan wants will get it in Solapur