सरपंच, ग्रामसेवक. लिपिकाने केला अपहार! एसीबीने चौकशी केली अन्...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

या गुन्ह्यात तत्कालीन ग्रामसेवक अशोक मुकुंद धाईंजे आणि लिपिक विजय खाशाबा बोडरे या दोघांना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तिसरा संशयित आरोपी रणदिवे याचा शोध सुरू आहे.

सोलापूर : शासनाच्या तेराव्या वित्त आयोगातील ग्रामनिधी व पाणीपुरवठा खात्यातून चार लाख 84 हजार 596 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माळशिरस तालुक्‍यातील फोंडशिरसचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व लिपिक अशा तिघांवर गुन्हा दाखल आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयाने केलेल्या चौकशीत शासकीय निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

काय घडलं आज सोलापूरच्या गुन्हे जगतात? वाचा...
बनावट पावत्या तयार केल्या

तत्कालीन सरपंच दादासाहेब महादेव रणदिवे (वय 34, रा. फोंडशिरस, ता. माळशिरस), तत्कालीन ग्रामसेवक अशोक मुकुंद धाईंजे (वय 56, रा. जाधववाडी, ता. माळशिरस) व लिपिक विजय खाशाबा बोडरे (वय 39, रा. फोंडशिरस, ता. माळशिरस) अशी आरोपींची नावे आहेत. फोंडशिरस ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली. त्यात तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व लिपिक या तिघांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग व गैरवापर केला आहे. 4 एप्रिल ते 10 डिसेंबर 2015 या कालावधीत संगनमताने तेराव्या वित्त आयोगातून फोंडशिरस ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून चार लाख 73 हजार 496 रुपये व पाणीपुरवठा खात्यातून 11 हजार 100 रुपये असे एकूण चार लाख 84 हजार 596 रुपयांचा धनादेश लिपिक बोडरे याच्या नावाने काढला. तिघांनी मिळून बेकायदेशीररीत्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचे दिसून आले आहे. रक्कम मिळविण्यासाठी तिघांनी संगनमताने ग्रामपंचायतीसाठी आवश्‍यक असणाऱ्या संबंधित वस्तू खरेदी न करता, बनावट पावत्या तयार केल्या. याबाबत ग्रामपंचायतीच्या कॅशबुक रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी घेतल्या आहेत. त्यामुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिस निरीक्षक कविता मुसळे या तपास करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक संजय पाटील, पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, लेखनिक सिद्धाराम देशमुख यांनी चौकशी केली. 

दोघांना पोलिस कोठडी 
या गुन्ह्यात तत्कालीन ग्रामसेवक अशोक मुकुंद धाईंजे आणि लिपिक विजय खाशाबा बोडरे या दोघांना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तिसरा संशयित आरोपी रणदिवे याचा शोध सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti-Corruption Investigation