ओढा पर्यटनाकडे : धार्मिक, कृषी, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनाबरोबरच खवय्यांसाठी प्रसिद्ध माढा तालुका 

किरण चव्हाण 
Wednesday, 23 September 2020

धार्मिक, कृषी, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनाबरोबरच खवय्यांच्या स्वादिष्ट जेवणासाठी माढा तालुका सुपरिचित आहे. माढा तालुक्‍यामध्ये असलेले उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गा लगतच उजनी धरण आहे. अगदी महामार्गावरूनही उजनी धरणाचे विलोभनीय दृश्‍य प्रवाशांच्या नजरेस पडते.

माढा (सोलापूर) : धार्मिक, कृषी, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनाबरोबरच खवय्यांच्या स्वादिष्ट जेवणासाठी माढा तालुका सुपरिचित आहे. माढा तालुक्‍यामध्ये असलेले उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गा लगतच उजनी धरण आहे. अगदी महामार्गावरूनही उजनी धरणाचे विलोभनीय दृश्‍य प्रवाशांच्या नजरेस पडते. 

Image may contain: one or more people, text that says 'w सत कुमदास'

उजनी धरणाचा परिसर हा पर्यटकांना आकर्षित करून घेतो. धरणाच्या बॅक वॉटरमध्ये विशिष्ट ऋतूमध्ये येणारे परदेशी फ्लेमिंगो पक्षी हे उजनी धरणावरील पर्यटकांना आकर्षित करून घेतात. उजनी धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्प व धरणाच्या दरवाज्यामधून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्‍य पर्यटक डोळ्यात साठवून ठेवतात. अर्थात पर्यटनाच्या अनुषंगाने उजनी धरणाचा परिसर आणखीनही विकसित करण्यासाठी भरपूर वाव आहे. उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये होणारी मासेमारी यामुळे टेंभुर्णी परिसरातील अनेक हॉटेलमध्ये या बॅक वॉटरच्या पाण्यात मिळणाऱ्या ताज्या माशांच्या मच्छी डिश प्रसिद्ध आहेत. 

Image may contain: people standing

सोलापूर - पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या धरणामुळे टेंभुर्णी, मोडनिंब परिसरामध्ये सुसज्ज व खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध असणारी अनेक हॉटेल्स आहेत. पर्यटक व प्रवासी आवर्जून याचा लाभ घेतात. याशिवाय या धरणातून भीमा नदीला जोडला गेलेला भीमा - सीना जोडकालवा जवळपास 22 किलोमीटरचा बोगदा पर्यटकांच्या उत्सुकतेचा विषय बनलेला असतो. उजनी धरणाच्या बॅक वॉटरवर माढा तालुक्‍यामध्ये डाळिंब, केळी, द्राक्ष, ऊस यासह इतर अनेक पिकांची लागवड केलेली आहे. येथील शेतकरी शेतीमध्ये विविध नवोपक्रम करत असल्याने कृषी पर्यटनाची जोड माढा तालुक्‍याला मिळालेली आहे. माढा तालुका वेल्फेअर फाउंडेशनने बेंद ओढ्याचे शास्त्रीय पद्धतीने केलेले रुंदीकरण व खोलीकरणही पाहण्यास अनेक लोक येतात. याबरोबरच या भागातील कृषी क्षेत्राला मिळालेली चालना व कृषी क्षेत्रात होणारे प्रयोग पाहण्यासही कृषी क्षेत्रातील लोक येतात. 

Image may contain: text that says 'श्री. विठठल मूर्ती'

निसर्ग पर्यटनाबरोबरच माढा तालुक्‍यामध्ये अनेक प्रसिद्ध अशी धार्मिक स्थळे आहेत. सोलापूर - पुणे हायवेलगत अरण येथील संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शिवाय लऊळ येथे संत कूर्मदास महाराजांचे मंदिर आहे. कुर्डुवाडी - पंढरपूर रस्त्यालगतच हे मंदिर आहे. त्यामुळे या दोन्ही धार्मिक स्थळांकडे भाविकांची रेलचेल वर्षभर सुरू असते. बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यालगत असलेल्या चिंचगाव टेकडी येथील महादेव मंदिरही अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून वर्षभर येथे विविध धार्मिक होतात. टेकडीचा परिसर निसर्गरम्य असल्याने सहलीही येथे येत असतात. 

माढयातील श्री माढेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर व माढ्यातील कसबा पेठेतील विठ्ठल मंदिरही प्रसिद्ध आहे. माढ्यातील या दोन्ही ठिकाणी वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्र व एकादशीला येथे लक्षणीय गर्दी असते. माढ्यातील राजे रावरंभा निंबाळकरांनी बांधलेल्या किल्ल्यालाही ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. माढ्यातील काही युवकांनी या किल्ल्याची स्वच्छता ठेवल्याने हा गढीवजा किल्लाही पाहण्यासारखा आहे. 

तालुक्‍यात कसे याल? 

  • कुर्डुवाडी येथे रेल्वे जंक्‍शन असल्याने देशभरातून रेल्वेने कुर्डुवाडीत येऊन तेथून एसटी बसने उजनी धरण, संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, संत कूर्मदास महाराज मंदिर, चिंचगाव टेकडी, माढ्यातील माढेश्वरी मंदिर व किल्ला यांसारख्या ठिकाणी सहज जाता येते. 
  • पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, मराठवाडा - बार्शी - कुर्डुवाडी, पंढरपूर या रस्ता मार्गाचा वापर करूनही तालुक्‍यातील पर्यटन स्थळांकडे जाता येते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apart from religious, agricultural, historical and nature tourism, Madha taluka is famous for its food