ग्रामीण भागात महिलांना रोजगार देणाऱ्या अंजनगाव उमाटे येथील अर्चना गुंड 

किरण चव्हाण 
Sunday, 18 October 2020

महिलांनाही मिळाले काम 
स्वत:चा काही तरी उद्योग असावा म्हणून व्यवसायास सुरुवात केली. पुढे कामासाठी महिलांची व भांडवलाचीही गरज भासू लागली. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र करत उद्योग उभा केला. यामुळे महिलांनाही काम मिळाले. व्यवसायही हळूहळू वाढू लागला आहे. 
अर्चना गुंड, नव उद्योजिका. 

माढा (सोलापूर) ः माढा तालुक्‍यातील अंजनगाव उमाटे या आडवळणी ग्रामीण भागात राहूनही तेथील अर्चना लक्ष्मण गुंड यांनी सेंद्रिय खत निर्मिती, मास्क, सॅनिटायझर, रुम फ्रेशनर, सेंद्रिय कीटकनाशके यासारखे उद्योग सुरु केले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी बचत गटातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. 

ग्रामीण भागात एखादा मोठा उद्योग करणे भौगोलिकदृष्ट्या जिकरीचे आहे. मात्र, समूह संसाधन व्यक्ती म्हणून काम करत असलेल्या गुंड यांनी 19 बचत गटाच्या माध्यमातून सुमारे 200 महिलांना एकत्र केले आहे. सुरूवातीला उदरनिर्वाहासाठी स्वत: कामास जाणाऱ्या गुंड आता महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. सध्या यातील काही महिला पिठाची चक्की, शिवणकाम, कापड दुकान यासारखे स्वयंरोजगार गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये महिलांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून त्यांनी नवीन संधी निवडल्या आणि यामधून त्यांनी मास्क व सॅनिटायझर निर्मिती सारखा व्यवसाय सुरू केला. सध्या या व्यवसायाला चांगली मागणी आहे. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे स्वतःला रोजगार मिळवता मिळवता इतर अनेक महिलांना जोडून त्यांनी लोणचे, पापड उद्योग सुरुवातीला सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीकडे लक्ष वळविले. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगण्याबरोबरच गांडूळ खताचा प्रकल्प त्यांनी उभा केला. लिक्विड सेंद्रिय खते, हर्बल टॉनिक, हर्बल कीटकनाशके, जीवामृत, दशपर्णी अर्क, पंचपर्णी अर्क या व इतर अनेक सेंद्रिय गोष्टी त्या परिसरातील शेतकऱ्यांना पुरवित आहेत. या माध्यमातूनही त्यांनी महिलांना रोजगार देता येतोय याशिवाय रासायनिक शेती टाळून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वाळवण्याचे कामही त्या करत आहेत. महिलांच्या रोजगाराबरोबर शेतकऱ्यांचे प्रबोधन असा दुहेरी फायदा या माध्यमातून होत आहे. भुमाता मेडिसिन व ग्रीन गोल्ड असे दोन ब्रॅंड त्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये आणले आहेत. अतिशय कमी भांडवलामध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. साधारणपणे 25 ते 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी हा सेंद्रिय खते, कीटकनाशके परिसरातील शेतकऱ्यांना पुरवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या माध्यमातून महिन्याला मागणीप्रमाणे वीस ते पन्नास हजारांपर्यंत उलाढाल होते. याशिवाय अंजनगाव उमाटे सारख्या ग्रामीण भागामध्ये रूम फ्रेशनर, सॅनिटायझर, फिनेल त्या बनवतात. अंजनगाव व परिसरातील गावातून येणारी मागणी व बचत गटाच्या प्रदर्शनात याची विक्री करत आहेत. 

संपादन ः संतोष सिरसट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Archana Gund from Anjangaon Umate, which employs women in rural areas