
प्रतिटन 700 ते 900 रूपये जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना कमी मिळतात म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षे, दीडवर्षे शेतात राबलेला नफाच हे कारखानदार गिळंकृत करतात त्यामुळे शेतकरी आयुष्यभर कर्जबाजारी रहात आहेत, हे वास्तव आहे.
नातेपुते ः संपूर्ण राज्यात सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र असून सर्वाधिक साखर कारखाने आहेत. दसऱ्यापासून बहुतांश साखर कारखाने सुरू झाले आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात तीन हजाराच्या आसपास पहिली उचल दिलेली आहे, तसेच पुणे जिल्ह्यात 2800 ते तीन हजार अशी उचल दिलेली आहे, दुष्काळी मराठवाड्यातही 2900 च्या पुढे उचल दिलेली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात एकाही साखर कारखानदारांने इतकी उचली दिलेली नाही. शेतकरी संघटनानी फक्त दोन हजार तीनशे रुपये पहिली उचल मागूनही साखर कारखानदार देण्यास टाळाटाळ करीत असून एरव्ही एकमेकाविरुद्ध लढणारे कारखानदार शेतकऱ्यांच्या उसाला कमी भाव देण्यासाठी हातहात घालुन पुढे सरसवाले आहेत.
शेतकऱ्यांना कमीत कमी दर कसा देता येईल, यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून ऊस उत्पादकांची जिरवण्यासाठी व स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी एका मंचावर येत असतात. या प्रवृत्तीविरुद्ध संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादक प्रचंड नाराज असून साखर कारखानदारांना विषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एरवी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप-शिवसेना, यांचे झेंडे हातात घेऊन एकमेकाविरुद्ध लढणारे उसाला भाव देताना मात्र, एका व्यासपीठावर येतात आणि ठामपणे शेतकरी संघटना म्हणेल त्या विषयावर एक मताने साखर संचालकांपुढे आपली भूमिका मांडतात. देशात ऊस उत्पादनासाठी समान खर्च येतो. तरीही साखर उतारा म्हणजे रिक्हवरीच्या नावाखाली कमीत कमी दर कसा देता येईल, हे साखर कारखानदार पहात आहेत.
वास्तविक पाहता केंद्र आणि राज्य सरकारने कडक कायदे करूनही, कायद्याला पळवाटा ठेवून साखर उत्पादनाचा प्रतिटन, वाहतूक खर्च जादा दाखवून सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना सर्व महाराष्ट्रात कमी दर दिला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी दराने ऊस मिळतो म्हणून लगतच्या पुणे व सांगली, सातारा या जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदार आपल्या ऊस तोडणीच्या टोळ्या पहिल्या दिवसापासून पाठवीत आहेत. ऊस उत्पादकांची जी अवस्था आहे .तिच अवस्था दूध उत्पादकांची ही आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी दूध दुसऱ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दररोज जात आहे. याची कुणालाही खंत नाही, हे शेतकऱ्यांचे नेते म्हणणाऱ्या नेत्यांना याचे सोयरसूतक अजिबात दिसत नाही.
संपादन : अरविंद मोटे