आषाढी 2020 : धाकट्या पंढरीचा यात्रा महोत्सवही रद्द 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

साडेतीनशे वर्षांची परंपरा स्थगित 
साडेतीनशे वर्षांची यात्रा परंपरा कोरोनामुळे प्रथमच स्थगित करण्यात आल्याने दुःख होत आहे. जगावर आलेले कोरोनाचे संकट श्री संत माणकोजी बोधले महाराजांनी दूर करावे, असे आम्ही बोधले महाराजांकडे साकडे घातले आहे. 
- विवेकानंद बोधले महाराज 

सासुरे (जि. सोलापूर) : धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धामणगाव (दु.) (ता. बार्शी) येथील आषाढी एकादशी ते पौर्णिमेदरम्यान साजरा होत असलेला आषाढी यात्रा महोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे यंदा धाकट्या पंढरीतील जल्लोष दुमदुमणार नाही. 
पंढरीच्या विठुरायाने धामणगावचे संत माणकोजी बोधले महाराज यांना साक्षात्कार दिला आणि तेव्हापासून दर आषाढी एकादशीला सावळा सुकुमार आपल्या लाडक्‍या भक्ताच्या भेटीला धामणगावात येतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणून असंख्य भाविक आषाढी एकादशीला येथे मोठी गर्दी करतात. धाकली पंढरी अशी ओळख असलेल्या धामणगावची आषाढी यात्रा पौर्णिमेपासून पुढे पाच दिवस भरते. आषाढी एकादशीला 
पालखी सोहळा, कुस्ती आणि कीर्तनासोबतच करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. 
मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे या वर्षी भाविकांना मंदिरामध्ये दर्शन घेता येणार नाही, असा ठराव धामणगाव येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत पोलिस उपअधीक्षक सिद्धेश्‍वर भोरे, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, तलाठी प्रशांत शेकदार, ग्रामसेवक एस. एस. गुजरे, उपसरपंच तानाजी पाटील, विवेकानंद बोधले, पोलिस पाटील गणेश मसाळ आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यात्रा महोत्सव रद्द झाल्याने भक्तांनी तसेच व्यावसायिकांनी धामणगावला येऊ नये तसेच ग्रामस्थांनाही मंदिर प्रवेशास मनाई असल्याने कायद्याचे पालन करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्‍वर भोरे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashadi 2020 Dhamangaon Yatra Festival also canceled