शासकीय महापूजेचा मान द्यावा सफाई कामगार दाम्पत्याला; कोणाची मागणी वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

कोणाला मान मिळणार याची उत्सूकता 
स्वीकृत नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परंपरा खंडित होऊ नये म्हणून पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचे काम करणाऱ्या नगर पालिकेच्या सफाई कामगार दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून यंदा मान दिला जावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांना भेटून श्री. वाघमारे यांनी लेखी निवेदन दिले आहे. दरम्यान, शासकीय महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कोणाला दिला जाणार याविषयी उत्सुकता निमार्ण झाली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी वारकरी दाम्पत्याला मान दिला जातो. कोरोनामुळे यंदा वारकऱ्यांना येण्यास मज्जाव केला असल्यामुळे वारकरी प्रतिनिधीचा मान यंदा पंढरपूर नगर पालिकेच्या सफाई कामगार दाम्पत्यास देण्यात यावा, अशी मागणी नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक कृष्णा नाना वाघमारे यांनी केली आहे. श्री. वाघमारे यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांना भेटून लेखी निवेदन दिले आहे. 
गेल्या काही वर्षापासून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे पूजा करण्याचा मान एका वारकरी दाम्पत्यास दिला जातो. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले आहे. एक जुलै रोजी होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. अद्याप मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी निर्णय जाहीर केलेला नाही. मंदिर समितीने मात्र आषाढी एकादशीच्या पूजेचे नियोजन सुरू केले आहे. 
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता म्हणून 17 मार्चपासून श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या काळात देखील कोणाही भाविकास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. यंदा वारकऱ्यांनी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदा कोणीही वारकरी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी येऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कोणाला दिला जाणार याविषयी उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashadi mahapuja should be honored to the cleaning worker couple