सोलापूरकर झाले अलर्ट...!

संजय पाठक
Monday, 13 April 2020

कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूमुळेव्हॉटस अप वर दिवसाला शेकडो पोस्ट पडताहेत. त्यातला पाच टक्के पण न्यूज खऱ्या नाहीत. असे असल्यामुळे कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूमुळे सोलापूर शहरातील विशेषतः पाच्छा पेठ, आधं दत्त चौक, बालाजी मंदिर, जीपी रोड, ग्रामीण पोलिस मुख्यालय, पोटफाडी, राजेंद्र चौक, कन्ना चौक, टिळक चौक, मधला मारूती अशा सर्व संवेदनशील परिसरात फिरून हा प्रत्यक्षदर्शी रिपोर्ट आपल्यासमोर मांडत आहे.

सोलापूर : आपल्याला काय बी होत नसतंय बे... ही सोल्लापुर म्हन्तो... आसल्यासोलापूरच्या उनात कोरोना टीकतोका बे... म्हणून सांग्तो आपल्याला काय बी होत नसतंय रे... अशी काल पर्यंत भाषा वापरणाऱ्या सोलापूरकरांची आता पाचावर धारण बसली आहे. कोरोना झाल्यामुळे सोलापुरात पहिला बळी रविवारी गेला. तेव्हापासून आख्खेसोलापूकरकर टरकलेत, घाबरलेत, हादरलेत..! 
कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूमुळेव्हॉटस अप वर दिवसाला शेकडो पोस्ट पडताहेत. त्यातला पाच टक्के पण न्यूज खऱ्या नाहीत. असे असल्यामुळे कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूमुळे सोलापूर शहरातील विशेषतः पाच्छा पेठ, आधं दत्त चौक, बालाजी मंदिर, जीपी रोड, ग्रामीण पोलिस मुख्यालय, पोटफाडी, राजेंद्र चौक, कन्ना चौक, टिळक चौक, मधला मारूती अशा सर्व संवेदनशील परिसरात फिरून हा प्रत्यक्षदर्शी रिपोर्ट आपल्यासमोर मांडत आहे. सोमवारी (ता. 13) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास दत्त चौक, माणिक चौक, मधला मारूती, टिळक चौक परिसरात चक्कर मारली. वर म्हटल्याप्रमाणे कालच्या घटनेपासून सोलापूरकर जाम घाबरलेत, हादरलेत हे मात्र मला जागोजागी स्पष्टपणे दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा "कर्फ्यूतील भ्रमंती' हा कॉलम "सकाळ"मध्ये लिहित होतो, तेव्हा मला जागोजागी, गल्लोगल्ली, बोळाबोळात तरूणांची गर्दी दिसून यायची. लोकांना सोशल डिस्टन्स पाळण्यात अजिबात इंट्रेस्ट नसल्याचे जाणवत होते. त्या उलट परिस्थिती सध्या सोलपूरच्या प्रत्येक गल्लीबोळात, मुख्य रस्त्यावर विशेषतः पाच्छापेठेसह आसपासच्या परिसरात दिसून येत आहे. 

हेही वाचा : लॉज बंदचा ‘या’वर असा झालाय परिणाम
दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास जेव्हा माणीक चौकातून समाचार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलो तेव्हा तो रस्ता पोलिसांनी बॅरेकेट टाकून पूर्णतः सील केला आहे. बाजूलाच काही पोलिस बसल्याचे दिसून आले. त्यातील लांबतुरे नावाच्या वाहतूक शाखेच्या पोलिसास बोलते केल्यावर त्यांनी सांगितले, आज नागरिकांचा आम्हाला काही त्रास झाला नाही. रस्त्यावर फारसे कुणी आले नाहीत. नाहीतर रोज आम्हाला आरडाओरडा काहीप्रमाणात लाठीचाही वापर करावा लागायचा. पण काल कोरोनाग्रस्त पहिला बळी गेल्यानंतर आज नागरिक मनातून घाबरल्याचे दिसते. त्यामुळेच कुणी रस्त्यावर आलेले नाहीत. त्यांच्या म्हणण्यात मला सत्यपणाही जाणवला, कारण आमची ही चर्चा सुरू असताना किमान दहा मिनीटे मी तिथं होतो, परंतु एकही व्यक्ती रस्त्यावर किंवा त्या सील केलेल्या बॅरेकेट जवळ आली नाही. 
तेथून माझा मोर्चा मधला मारूती चौकाकडे वळवला. याठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या सातव्या क्रमांकाच्या विभागीय कार्यालाकडून हात धुण्यासाठी पाण्याची टाकी, बेसीन व लिक्विड सोपची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. निर्मनुष्य रस्त्यावर फुल बाजार भरतो त्या दिशेला सावली असल्याने याठिकाणी सात आठ पोलिस बसल्याचे दिसून आले. तेथून टिळक चौकाकडे चक्कर मारून मी पुन्हा माझा मोर्चा कौंतम चौकाकडे वळविला. पावणेदोनच्या सुमारास येथील मशिदीमधून स्पीकरवरील नमाजचा खणखणीत आवाज कानावर पडला. अर्थात मी आवर्जून मशिदीजवळ थांबलो, पण याठिकाणी अजिबात गर्दी दिसून आली नाही. गेल्या काही दिवसापूर्वी मी जेव्हा "कर्फ्यूतील भ्रमंती"हा कॉलम लिहित होतो, तेव्हा मात्र याच मशिदीजवळ दुपारच्या नमाजाच्यावेळी काही व्यक्ती मला दिसून आल्या होत्या, पण आज कोरोनाग्रस्त पहिला बळी गेल्यानंतर या भागातील लोकांमध्ये अव्हेअरनेस आलेला दिसून आला. तेथून कुंभार वेस रस्त्याकडे निघालो पण तो रस्ता सील केल्याचे दिसून आले. पावणे दोन - दोन वाजण्याच्या सुमारास मी कन्ना चौकाकडे निघालो, या परिसरातून छोटे मोठे रस्ते जे की मुख्य रस्त्याला येऊन भिडतात ते सर्व रस्ते पोलिसांनी बॅरेकेट टाकून सील केल्याचे दिसून आले. काही रस्ते काठ्या - बांबूनी सील केल्याचे दिसून आले. एकही मनुष्य या भागातील रस्त्यावर फिरकताना दिसून आला नाही हे विशेष. 

कन्ना चौकातून राजेंद्र चौकात मी बरोब्बर दोन वाजण्याच्या सुमारास पोहोचलो. याठिकाणाहून उजव्या बाजूने जाणारा म्हणजे पाच्छा पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तंबू टाकून तत्पुरती पोलिस चौकी उभा केल्याचे दिसून आले. हा रस्ता मोठमोठे बॅरेकेट टाकून सील करण्यात आल्याचे दिसून आले. माझ्या गाडीचा आवाज येतात चार पाच पोलिस, एक कमांडो वेशातील कर्मचारी लगेचच अलर्ट होऊन समोर आले. "हा रस्ता सील आहे, तुम्हाल येथून जाता येणार नाही. तुमच्याकडे कुठलाही परवाना असला तरी आम्ही तुम्हाल येथून सोडू शकत नाहीत. तुम्ही इथून जा..." असा रोखठोक शब्दात एका पोलिस कर्मचाऱ्याने मला इशारा दिला. तरीही तेथे थांबून त्यापैकी एका पोलिस कर्मचाऱ्यास मी बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर बहुधा वरिष्ठाचे किंवा कामाचे प्रेशर असावे. ते कर्मचारीही काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांचे आपले एकच पालुपद सुरू होते, तुम्ही जा पाहू इथून आधी... शेवटी मी तेथून काढता पाय घेतला. 
बाजार समिती मार्गावरून मी साधारणतः दोन वाजून दहा मिनीटानी गाडी मारत निघालो. एरवी हेवी ट्रक्‍सने व्यापलेला हा रस्ता पूर्णतः वाहनमुक्त, निर्मनुष्य होता. मग या परिसरातील वेगवेगळ्या छोट्यामोठ्या रस्त्या, गल्ल्यातून प्रवास करत अखेर मी पाण्याच्या टाकी चौकात आलो. तर येथूनही पाच्छापेठ कडे जाणारा रस्ता पोलिसांनी सील केला होता. याठिकाणीही सात आठ पोलिसांचा फाटा चोख पहारा देत असल्याचे दिसून आले. लांबूनच फोटो घेऊन पुढे मी आम्रपाली चौकावरून ग्रामिण पोलिस मुख्यालयाच्या पेट्रोल पंपाजवळ आलोय .

याठिकाणी मला एक सुखद चित्र दिसले. संजीवनी सॅनिटायझेशन टनेलमार्फत या पंपाच्या एंट्रीपॉईंटलाच मीच माझा रक्षक या स्लोगनखाली एक छोटी ग्रीन नेटची जाण्यायेण्यासाठी कमान करण्यात आली आहे. गाडी आत घातल्यावर याठिकाणी वाहन धारकास काहीक्षण थांबण्यास सांगितले जाते. मग त्याच्या अंगावर सहा वेगवेगळ्या तुषारसिंचन योजनेमधून सॅनेटायझरची फवारणी होते. मगच वाहनधारक पेट्रोल खरेदी करण्यासाठी आत प्रवेश करू शकतो. मी त्याचा अनुभव घेतला. गाडीसह माझ्या अंगावर जेव्हा असे तुषारसिंचन झाले तेव्हा मला फार छान वाटले, कारण दीर्घकाळापासून मी उन्हात गाडीवर प्रवास करत होतो. 

हेही वाचा कामगारांसाठी मोठा निर्णय ! दोन टप्प्यात मिळणार पाच हजार रुपये

तेथून पुढे साधारणतः सव्वादोन, दोन वीस वाजण्याच्या सुमारास मी पोटफाडी चौकात आलो. याठिकाणाहून बालाजी मंदिर, पाच्छापेठकडे जाणाऱ्याग्रामीण पोलिस मैदानाच्या बाजूचा मोठा रस्ता पोलिसांनी सील केल्याचे दिसून आले. याठिकाणी एक तात्पुरती पोलिस चौकी उभारण्यात आल्याचे दिसून आले. त्याशिवाय याच चौकात पोलिसांना बसण्यासाठी आणखी एक मोठा मांडव घालण्याचे काम सुूर असल्याचे दिसून आले. या चौकात लोक बालाजी मंदिर परिसरात जाण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालतना दिसून आले. पण पोलिसांचे डोक्‍यावर बर्फ व तोंडात साखर ठेऊन काम सुरू होते. पोलिस ताफ्यातली प्रत्येक कर्मचारी नागरिकांना हेच सांगत होता, आहो हा रस्ता सील करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही या मार्गावर जाऊ शकत नाही. पुढे सर्वोपचार

रूग्णालयावरून (कै.) वसंतदादा पाटील पुतळा असलेल्या चौकात मी आलो. येथून बेगम पेठ चौकीकडे जाणाऱा मार्गही सील करण्यात आला आहे. याठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त आहे. बेगम पेठ पोलिस चौकी, मीना बाजार परिसर, विजापूर वेस हा परिसर पूर्णतः निर्मनुष्य आहे. या भागातून ना कुणाला बाहेर पडण्याची परवानगी आहे ना, या भागात प्रवेश करण्याची कुणाला परवानगी. यामुळे हा परिसर अक्षरशः भर दुपारी भयाण शांत, शांत जाणवला... एकूणच हा प्रत्यक्ष घटनास्थळावरून हा अतिशय वस्तुनिष्ठ रिपोर्ट वाचकांसाठी टिपताना एक वारंवार जाणवले की, सोलापूरकर टरकलेत, घाबरलेत, हादरलेत...! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The background of the Corona situation in Solapur