गुरुवारपासून सिध्देश्‍वर बॅंक सेवक सांस्कृतिक मंडळाची शारदोत्सव व्याख्यानमाला 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 21 October 2020

या व्याख्यान मालेत व.पु.काळे, कविवर्य मंगेश पाडगावकर, उज्वल निकम, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, स्मिता तळवलकर, सुनंदन लेले, अरविंद बोकील, रामचंद्र देखणे यांच्यासह अनेक नामवंतांनी उपस्थिती लावली आहे. 

सोलापूरः शहरातील सिध्देश्‍वर बॅंक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शारदोत्सव व्याख्यानमाला गुरुवार (ता.22) पासून सुरू होत आहे. या व्याख्यानमाले नामंवत व्याख्यात्यांची व्याख्याने फेसबूक लाईव्ह होणार आहेत. 

हेही वाचाः ऊस तोडणी मजुरांचे कचरेवाडी येथील कोयता बंद आंदोलन आश्‍वासनानंतर स्थगित 

व्याख्यानमालेचे हे 37 वर्ष आहे. कोरोना संकटामुळे ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून संयोजकांनी फेसबूक लाईव्ह द्वारे आयोजन केले आहे. सहकार महर्षी कै.वि.गु. शिवदारे आण्णा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर सिध्देश्‍वर बॅंक स्थापन झाली. आजमितीस जिल्ह्यातील ही अग्रगण्य बॅंक म्हणून ओळखली जाते. बॅंकींगसोबत समाजात सामाजिक चेतना निर्माण व्हावी यासाठी बॅंकेच्या सेवकांनी 1983 ला सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. 

हेही वाचाः शिक्षक बचत गटाने दिव्यांग मुलीला केली शिक्षणासाठी मदत 

या व्याख्यान मालेत व.पु.काळे, कविवर्य मंगेश पाडगावकर, उज्वल निकम, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, स्मिता तळवलकर, सुनंदन लेले, अरविंद बोकील, रामचंद्र देखणे यांच्यासह अनेक नामवंतांनी उपस्थिती लावली आहे. 
गुरुवारी (ता.22) रोजी लेखक अभय भंडारी यांचे भारतीय संस्कृती आणी जगण्यातील आनंद या विषयावर व्याख्यान होईल. विटा येथील प्रगतीशील शेतकरी असलेले अभय भंडारी हे प्रख्यात विचारवंत व उत्तम वक्ते म्हणून परिचित आहेत. शुक्रवारी (ता.23) सायंकाळी साडे सहा वाजता प्रख्यात शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे शिवरायांची विविध रुपे या विषयावर व्याख्यान होणार आहे. आयुर्वेद तज्ञ असलेले डॉ. शेटे हे दुर्गभ्रमंतीकार आहेत. सोलापुरातील हिंदवी परिवाराचे ते संस्थापक आहेत. प्रभावी शैली व शिवचरित्राचा गाढा अभ्यास ही त्यांच्या वक्तृत्वाची वैशिष्टये आहेत. 
शनिवारी (ता.24) सायंकाळी साडेसहा वाजता "ती" ची गाणी हा संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. चैत्राली अभ्यंकर व हेमंत वाळूजकर या कलाकारांचा गोल्डन मेमरीज हा ग्रुप युवा गायक व वादकांचा ग्रुप आहे. नवरात्री हा स्त्री शक्तीचे सामर्थ्याचा हा सोहळा असल्याने मराठी कवियित्रींनी रचलेली गाणी हे कलावंत सादर करतील. 
व्याख्यानमाला www.facebook.com.solapursiddheswarsanskrutik/ या लिंकवर रसिकांना पाहता येणार आहे. या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम शर्मा, सोलापूर सिध्देश्‍वर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश वाले व उपाध्यक्ष नरेंद्र गंभिरे यांनी केले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Sevak Sanskritik Mandal's Sharadotsav lecture series on Siddheshwar from Thursday