बार्शी टपाल कार्यालयाची आधुनिकतेकडे वाटचाल ! ग्राहकांना ऑनलाइन सेवा 

Post Office
Post Office

बार्शी (सोलापूर) : बार्शी उपविभागात 87 पोस्ट कार्यालये असून, या विभागाअंतर्गत मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर या तालुक्‍यांचा काही भाग येतो. बार्शी शहरात चार पोस्ट कार्यालये असून शहर अन्‌ तालुक्‍यात 141 डाक सेवक, 14 पोस्टमन, 25 कर्मचारी, पाच अधिकारी कार्यरत आहेत. आधुनिकतेकडे पूर्ण वाटचाल झाली असून ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाइन सेवा दिली जात आहे. 

9 ऑक्‍टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो; तसेच 9-15 ऑक्‍टोबर हा राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सोलापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर सूर्यकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहरात लॉकडाउनमध्येही पोस्टमास्तर श्रीमती एम. ए. कांबळे, उल्हास सुतार, महेश तोष्णीवाल यांच्या नियंत्रणाखाली उत्तम प्रकारे कामकाज चालू असल्याची माहिती बार्शी उपविभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी दिली. 

संपूर्ण भारतभरात एकूण 1 लाख 54 हजार 866 टपाल कार्यालये आहेत. त्यापैकी एकूण 1 लाख 39 हजार 40 कार्यालये ग्रामीण भागात तर 15 हजार 826 कार्यालये शहरी भागात आहेत. टपाल विभागाचा आणखी एक महत्त्वाचा विभाग म्हणजे तिकीट प्रकाशन विभाग (फिलाटेलिक ब्यूरो). हा विभाग पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि वेळोवेळी नवनवीन तिकिटांचे प्रकाशन यामार्फत होत असते. देशातील सांस्कृतिक घडामोडींचे प्रतिबिंब तिकिटातून घडत असते. कला, साहित्य, क्रीडा या सर्व गोष्टींचा समावेश टपाल तिकिटांतून होतो. विश्वबंधुत्व, एकोपा, सलोखा हा टपाल तिकिटाचा गाभा मानला जातो. 

पोस्टाच्या योजनेपैकी इलेक्‍ट्रॉनिक मनिआर्डर सेवा लाभदायी आहे. काही क्षणात (मनिआर्डर) एका क्‍लिकवर हव्या त्यास्थळी पोचू शकते. इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बेक (आयपीपीबी) द्वारे आपण डिजिटल खाते खोलू शकतो. सर्व व्यवहार ऑनलाइन करू शकतो. रजिस्टर, स्पीड पोस्ट, व्हीपी, एक्‍सप्रेस पार्सल, इन्शुअर्ड या सेवाही अतिशय पारदर्शी आहेत. आता सर्व प्रकारची पंजीकृत पत्रे ऑनलाइन तपासता येतात, त्यामुळे कामात पारदर्शकता आली आहे. 

जुन्या काळातील पोस्ट ऑफिस आणि सध्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये आमुलाग्र बदल झाल्याचे अनुभवण्यास मिळते. या सेवांसोबत पोस्टाची बॅंकिंग सेवा सुद्धा चांगली आहे. आजही सुरक्षित ठेव ठेवायची असेल तर पोस्टासारखा उत्तम पर्याय नाही. बचत बॅंक, आवर्त ठेव, सुकन्या, मुदत ठेव, वरिष्ठ नागरिक योजना, पीपीएफ, मंथली इन्कम स्कीम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे सर्व व्यवहार आता ऑनलाइन पद्धतीने केले जातात. बॅंकिंगच्या दृष्टीने टपालखाते हळूहळू परंतु खंबीर आणि दमदार पावले टाकत आहे. कॅश ऑन डिलिव्हरी सेवासुद्धा खात्याचे नवीन पाऊल आहे. 

आधार कार्ड नूतनीकरण व दुरुस्ती पोस्ट ऑफिसमध्ये करता येते. अनेक स्पर्धा परीक्षा असतात त्याची प्रवेश फी ऑनलाइन भरायची असते. त्याचीही सोय पोस्टामार्फत केली जाते. सर्व कॅश पेमेंट ई-पेमेंट स्वरूपात सहज शक्‍य झाले आहे. 

टपाल विभागाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील प्रत्येक कर्मचारी कटिबद्ध आहेत आणि तो तितक्‍याच प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले योगदान देत आहे. त्यामुळे आधुनिकतेची कास धरत माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खातेसुद्धा तितक्‍याच समर्थपणे वाटचाल करीत आहे, यात अजिबात शंका नाही. उज्ज्वल परंपरा असलेल्या टपाल खात्याला पुन्हा वैभवाचे दिवस नक्कीच दिसतील! 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com