अजित पवारांच्या "त्या' सवालामुळे राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक केली प्रतिष्ठेची !

प्रमोद बोडके 
Thursday, 14 January 2021

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश या टप्प्यात असल्याने हा टप्पा सोलापूर जिल्ह्यासाठी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश या टप्प्यात असल्याने हा टप्पा सोलापूर जिल्ह्यासाठी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तुमच्या गावातील ग्रामपंचायत तुमची आहे का, असा सवाल थेट उपमुख्यमंत्री अजित पवारच विचारत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ग्रामपंचायतीची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या निवडणुकीसाठी आपल्या गावांमध्ये तळ ठोकून बसले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांची वडाळा ग्रामपंचायत, जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची नरखेड ग्रामपंचायत या निवडणुकीला सामोरे जात आहे. या गावांमध्ये निवडणुकीचा काय निकाल लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या गावात देखील निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, कै. भारत भालके यांच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला घवघवीत यश मिळण्याची आशा आहे. 

बार्शी तालुका हा देखील एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या तालुक्‍यातील राष्ट्रवादीची धुरा आता निरंजन भूमकर यांच्यावर आहे. माळशिरस तालुक्‍यात उत्तम जानकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला नेतृत्व मिळाल्याने या तालुक्‍यात देखील राष्ट्रवादी कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी नाममात्र आहे. त्यामुळे येत्या काळात या तालुक्‍यांमध्ये पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये मोहोळ तालुक्‍यातील 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनगर परिसरातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्या पेनूर गावात काय निकाल लागतो? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

सत्तेचा फायदा 
राष्ट्रवादी कॉंग्रेस अनपेक्षितपणे 2019 मध्ये राज्याच्या सत्तेत आली आहे. सत्तेच्या माध्यमातून गावा- गावापर्यंत पोचण्यात राष्ट्रवादी यशस्वी होताना दिसत आहे. राज्यातील सत्तेमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 2022 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निवडणुकीची पायाभरणी महत्त्वाची मानली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The big leaders in the NCP have made the Gram Panchayat elections a matter of prestige