बससेवा सुरू करण्याचा निर्णय अंगलट! दोन दिवसांत 70 हजार रुपयांचा भुर्दंड

City Bus
City Bus

सोलापूर : महापालिकेची परिवहन बससेवा सुरू करण्यात आली. दोन दिवसांत परिवहनला चार हजार 168 रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसरीकडे मात्र तब्बल 70 हजार रुपयांहून अधिक भुर्दंड सोसावा लागला. मंगळवारी अवघे दोन हजार 240 रुपये मिळाले. तरीही आणखी चार-पाच दिवस परिवहन सेवा सुरूच ठेवली जाणार आहे. 

परिवहनच्या 11 बसगाड्या मंगळवारी (ता. 11) शहरातील विविध मार्गांवरून धावल्या. या बस 728 किलोमीटर धावल्या असून, प्रति किलोमीटर तीन रुपयांचे उत्पन्न मिळाले. परंतु, "ना नफा ना तोटा' या तत्त्वानुसार परिवहन सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रति किलोमीटर किमान 45 रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. दुसऱ्या दिवशी इंधनावर 14 हजार 560 रुपयांचा तर 22 कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 16 हजार रुपयांचा खर्च झाला. सोमवारी (ता. 10) प्रवाशांचा प्रतिसाद कमी आढळल्याने तीन बस दुसऱ्या दिवशी बंद ठेवल्या. आता आगामी पाच दिवसांपर्यंत ही सेवा अशीच सुरू ठेवली जाणार आहे. दररोज 11 बस धावणार असून पुढील आठवड्यात त्याचा अहवाल महापालिका आयुक्‍तांना दिला जाणार आहे. 

तोटा होतानाही व्यवस्थापकांचा अट्टहास 
शहरातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारली नसून, बसमधून प्रवास करणारे नागरिक घरीच बसून आहेत. शहरातील छोटे-मोठे बहुतांश उद्योग, व्यवसाय अद्यापही बंदच आहेत. त्यातच शहरात 16 हजारांहून अधिक रिक्षा आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रवासी मिळणार नसल्याची जाणीव असतानाही अशा कठीण परिस्थितीत परिवहनची बससेवा सुरू कोणासाठी आणि का केली, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. अडचणीतील परिवहनला दोन दिवसांत 70 हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. तरीही आणखी पाच दिवस हा उपक्रम सुरूच राहणार असल्याने हा भुर्दंड अडीच ते तीन लाखांवर जाणार आहे. दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल या आशेने आणखी काही दिवस बससेवा सुरू राहील, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक श्रीशैल लिगाडे यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com