सरपंचपदासंबंधी मोठी बातमी !...तर खुल्या जागेवरील आरक्षित उमेदवार होणार सरपंच; विरोधकांनाही सरपंचपदाची संधी

तात्या लांडगे
Saturday, 23 January 2021

पार्टीकडून दररोज ठेवला जातोय सदस्यांवर वॉच 
सरंपचपदाचे आरक्षण जाहीर होईपर्यंत आपल्या गटातील उमेदवार विरोधकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून दररोज वॉच ठेवला जात आहे. बहूतांश ग्रामपंचायतींवर निसटती सत्ता काबिज करणाऱ्या गटांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक जरी सदस्य विरोधकांच्या गळाला लागल्यास आपली सत्ता जाईल, याची चिंता अनेकांना लागली आहे. त्यामुळे दररोज त्याची भेट घेणे, त्याला कॉल करुन फिरायला जाणे असे प्रकार गावगाड्यात सुरु आहेत. तर काहीजण गोव्यासह अन्य ठिकाणी फिरायला गेल्याचेही चित्र आहे. 

सोलापूर : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 फेब्रुवारीला झाली असून मतमोजणीही पार पडली आहे. आता सरपंचपदाचे वेध लागले असून आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षणाची सोडत 27 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीपर्यंत सरपंचपदाची निवड केली जाणार आहे.

ठळक बाबी... 

  • सत्ताधाऱ्यांकडे सरपंच आरक्षणाचा उमेदवार नसल्यास विरोधकांकडील त्या प्रवर्गातील सदस्य होईल सरपंच 
  • दोन्ही गटाकडे आरक्षित जागेवर निवडून आलेला सरपंचपदाचा उमेदवार नसल्यास खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या त्या प्रवर्गातील उमेदवाराला होता येईल सरपंच 
  • खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्या आरक्षित उमेदवाराकडे सरपंचपद जाणार असल्यास त्याच्यासाठी ठरला नियम 
  • तहसिलदारांकडून अर्ज घेऊन जात पडताळणी समितीकडे दाखल करावा प्रस्ताव; त्या समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याची पोहच तहसिलदारांना द्यावी लागणार 
  • आगामी सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र तहसिलदारांना देणे त्या उमेदवारास राहणार बंधनकारक 
  • 27 जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत 
  • 10 फेब्रुवारीपर्यंत सोलापूरसह राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींचे ठरणार कारभारी 

 

ग्रामपंचायत आम्ही मिळविली, आमचेच सर्वाधिक उमेदवार विजयी ठरले, असा दावा करणाऱ्यांना आता सरपंच आरक्षणाची चिंता लागली आहे. सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही सरपंच आरक्षण कोणत्या प्रवर्गातील पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, एखाद्या गटाचे सर्वाधिक उमेदवार विजयी ठरल्यानंतरही त्यांच्याकडे सरपंच आरक्षणानुसार संबंधित उमेदवार नसल्यास विरोधकांकडील त्या प्रवर्गातील उमेदवाराला सरपंचपदाची लॉटरी लागणार आहे. तसेच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटाकडे त्या प्रवर्गातील उमेदवार नसल्यास काय, असाही प्रश्‍न भेडसावू लागला आहे. तर त्यावेळी बहूमत असलेल्या गटातील एखादा उमेदवार खुल्या जागेवर विजयी झाला असेल, परंतु तो सरपंचपदाचे आरक्षण पडलेल्या त्या मागास प्रवर्गातील असल्यास त्या उमेदवाराला सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तसा उमेदवार सर्वाधिक जागा विजय झालेल्या गटाकडे नसेल आणि तो उमेदवार कमी जागा विजयी झालेल्या गटाकडे असल्यास तो सरपंच होईल, अशी माहिती तहसिलदार अमोल कुंभार यांनी दिली. मात्र, त्या उमेदवाराने आमच्याकडून एक अर्ज घ्यावा आणि जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव द्यावा. त्यानंतर प्रस्ताव दाखल केल्याची पोहच आमच्याकडे सादर करावी आणि आगामी सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र द्यावे, असेही श्री. कुंभार यांनी स्पष्ट केले. 

पार्टीकडून दररोज ठेवला जातोय सदस्यांवर वॉच 
सरंपचपदाचे आरक्षण जाहीर होईपर्यंत आपल्या गटातील उमेदवार विरोधकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून दररोज वॉच ठेवला जात आहे. बहूतांश ग्रामपंचायतींवर निसटती सत्ता काबिज करणाऱ्या गटांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक जरी सदस्य विरोधकांच्या गळाला लागल्यास आपली सत्ता जाईल, याची चिंता अनेकांना लागली आहे. त्यामुळे दररोज त्याची भेट घेणे, त्याला कॉल करुन फिरायला जाणे असे प्रकार गावगाड्यात सुरु आहेत. तर काहीजण गोव्यासह अन्य ठिकाणी फिरायला गेल्याचेही चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big news about Sarpanchpada! ... then Sarpanch will be the reserved candidate who has won the open seat