विजापूर रस्ता बंद सोलापूरकर त्रस्त 

solapur trafik problem
solapur trafik problem

दक्षिण सोलापूर ः सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजीराजे तलावाजवळील रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या कामासाठी विजापूर रस्ता मंगळवारी (ता.6) सायंकाळी सहा वाजल्यापासून जड वाहनासह अन्य वाहतुकीसाठी बंद केला. या रोडवरील वाहतूक मोदी स्मशानभूमीमार्गे तसेच आसरा व जुळे सोलापूरमार्गे वळवण्यात आल्याने जड व अन्य वाहनाच्या प्रचंड वर्दळीने या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने एकाच दिवसात रहिवाशी त्रस्त झाले आहेत. 

शहरातील रस्ते खोदाईमुळे शहरवासिय त्रासलेले असतानाच जुळे सोलापुरातही वाहतुकीच्या नव्या समस्येने त्रासात भर पडली आहे. महापालिकेने ड्रेनेज लाईनच्या कामासाठी विजापूर रोडवरील संभाजी तलावाजवळील रेल्वे पुलावरील वाहतूक बंद केली. पोलिस प्रशासनाच्यावतीने त्याबाबतचे आवाहनही करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून या रोडवरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली. रेल्वे स्टेशन व सात रस्त्याकडून विजापूर रोडवर जाण्यासाठी मोदी स्मशानभूमीपासून रेवणसिद्धेश्‍वर मंदिरासमोरून विजापूर नाका मार्गे वाहतूक वळवण्यात आली. तर गुरुनानक चौकाकडून विजापूर रोडवर जाणारी वाहने होटगी रोड, आसरा, डी-मार्ट मार्गे विजापूर रोडकडे वळवण्यात आली आहेत. काल एकाच रात्रीतील प्रचंड संख्येतील वाहनांच्या वाहतुकीमुळे जुळे सोलापूर व मोदी परिसरातील रहिवाशी वैतागले आहेत. 

मोदी स्मशानभूमी परिसरात अरूंद रस्ता असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. येथील जुन्या रेल्वे फटाकजवळील पुलाखालून फक्त दुचाकी जाण्याएवढीच जागा असताना अनेक चारचाकी वाहनचालक व रिक्षाचालक तेथूनच वाहने दामटत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. अनेक वाहनांना येथील जुने रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद असल्याने मोदी स्मशनाभूमीकडून मोदी पुलापर्यंत जावे लागत आहे. परंतु हा रस्ता खुपच अरूंद व अनेक अडथळ्यांचा असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय या परिसरात असलेल्या दाट लोकवस्तीमुळे अपघात होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागत आहे. येथील घरे रस्त्याला अगदी चिकटून घरे असल्याने वाहनधारकांना डोळ्यात तेल घालूनच वाहने चालवावी लागत आहेत. वाहनांच्या या वर्दळीमुळे येथील रहिवाशांना आपल्या घराबाहेर पडणेही मुश्‍किल झाले आहे. कर्णकर्कश हॉर्न, वाहनामुळे उडणारी धुळ, वाहनांची गर्दी, वाहतुकीची कोंडी तसेच वाहनधारकात होणारी वादावादी यामुळे येथील रहिवासी एकाच दिवसात या वाहतुकीमुळे त्रस्त झाले आहेत. असाच अनुभव आसरा पसिरासह जुळे सोलापुरातील नागरिकांचा आहे. 

आसरा चौकातील सिग्नलमुळे वाहनांची रांग थेट रेल्वे पुलापर्यंत गेली होती. त्यातून पुलावरील खड्डे न बुजवल्याने अनेक वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहन चालवावे लागत आहे. महावीर चौकात पडलेल्या खड्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्‍यात घालुन प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही. 

जुळे सोलापूर परिसारातील व्यापारी नितीन गोवर्धन यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, काल एका रात्रीत सुमारे चारशे ते पाचशे वाहनांची प्रचंड वर्दळ होती. रात्रभर जोरात वाजणारे हॉर्नसह वाहनांच्या आवाजामुळे झोप लागणे मुश्‍किल झाले. भारती विद्यापीठ व चैतन्य मंडई परिसरात खूप वसाहती असून ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे. त्यांना याचा त्रास होत आहे. ड्रेनेज लाईनचे कामही होणे महत्त्वाचे असल्याने त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नसला तरी काम गतीने करावे. 

जुळे सोलापूर परिसरातील रहिवाशी शिवकुमार कोळकुरे यांनी सांगितले की, खरे तर हे काम लॉकडाउन काळात होणे आवश्‍यक होते. परंतु नेहमीप्रमाणे महापालिकेला उशिराच जाग आली. चार महिन्यानंतर आता कुठे बाजार सुरळीत होत असताना गावात रस्ते खोदाई अन्‌ इकडे वाहतुकीची कोंडी असा दुहेरी त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विकासासाठी थोडी कळ सोसू पण काम लवकर संपवावे. 

दावत चौक परिसरातील रहिवाशी अतुल वाघोलीकर यांनी सांगितले की, मोदी रेल्व गेटजवळील पुलाखालूनची वाहतूक पोलीसांच्या नियंत्रणात होणे गरजेचे आहे. दुचाकी जाणेही कठीण असताना रिक्षा व चारचाकी वाहने याखालून नेले जात असल्याने वादावादीसह वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथे एक पोलिस नेमावा. 

"सकाळ' तनिष्काच्या सदस्या अश्‍विनी राठोड यांनी सांगितले की, 
स्मशानभुमीजवळील वसाहतीत आम्ही राहतो. या रस्त्यावर काल रात्रीपासून अचानक वाहतूक वाढल्याने घराबाहेर तोंड काढणेही कठीण झाले आहे. लहान मुलांना तर घराच्या अंगणात व रस्त्याच्या कडेला खेळताही येत नाही. घरातील महिलांना दिवसभराच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाचा त्रास होत असून नसलेले आजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

जानकीनगर, जुळे सोलापूर परिसरातील कैलास छपरे यांनी सांगितले की, आसरा चौकात अगोदरच होणाऱ्या वाहतूक कोंडीत आता वाढ झाली आहे. येथील रेल्वे पुलावर मोठे खड्डे पडल्याने आदीच कसरत करावी लागत असताना आता वाहतूक कोंडीने अधिकच त्रास सुरू झाला आहे. मोदी रेल्वे गेटजवळील पुलाखालून वाहनांची एक दाटी होत असताना जनावरेही येथूनच नेण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. येथे पोलीसाची नेमणूक करून वाहतूक सुरळीत करावी. 

मोदी परिसरातील रहिवाशी विद्या कांबळे यांनी सांगितले की, काल रात्रीपासून वळवण्यात आलेल्या वाहतूकीमुळे वाहनांची वाढलेल्या वर्दळीचा खुपच त्रास आम्हाला होत आहे. मोदी परिसरात अगदी रस्त्याला चिकटून वसाहत आहे. घरासमोर लेगच रस्ताच असल्याने या वाहनांचा खुपच त्रास होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना तर घराबाहेर पडणेही मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईनचे हे काम लवकरात लवकर संपवून वाहतूक सुरळीत करावी. 

संपादन : अरविंद मोटे 

महाराष्ट्र सोलापूर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com