माळीनगर येथील पक्ष्यांचा "सारंगगार' बर्ड फ्लूपासून सुरक्षित ! पक्षी अभ्यासकांचे वारंवार भेटी देऊन सर्वेक्षण 

मिलिंद गिरमे 
Tuesday, 9 February 2021

सध्या राज्यात बर्ड फ्लूची साथ चालू असून, विविध ठिकाणी पक्षी मृत्युमुखी पडत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र नाना तऱ्हेच्या हजारो पक्ष्यांचे मुक्कामाचे ठिकाण असलेल्या माळीनगर येथील सासवड माळी साखर कारखाना परिसर मात्र सुरक्षित असल्याची पुष्टी स्थानिक पक्षी अभ्यासकांकडून मिळाली आहे. 

लवंग (सोलापूर) : सध्या राज्यात बर्ड फ्लूची साथ चालू असून, विविध ठिकाणी पक्षी मृत्युमुखी पडत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र नाना तऱ्हेच्या हजारो पक्ष्यांचे मुक्कामाचे ठिकाण असलेल्या माळीनगर येथील सासवड माळी साखर कारखाना परिसर मात्र सुरक्षित असल्याची पुष्टी स्थानिक पक्षी अभ्यासकांकडून मिळाली आहे. डॉ. अरविंद कुंभार व ऋतुराज कुंभार या स्थानिक पक्षी अभ्यासकांनी या परिसरातील पक्ष्यांच्या ठिकाणांना वारंवार भेट देत सर्वेक्षण करून ही माहिती दिली आहे. तसेच सध्या परिसरावर कारखाना प्रशासन सुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन आहे. 

दिवसभर उदरनिर्वाह करून झाल्यानंतर विविध प्रकारचे पक्षी सुरक्षित ठिकाणी एकत्र येऊन मुक्काम करतात. पक्ष्यांच्या या मुक्कामाच्या ठिकाणाला सारंगगार असे म्हणतात. इंग्रजीत रुस्टिंग प्लेस असे म्हणतात. माळीनगर येथील कारखाना परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सारंगगार थाटले आहे. 89 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कारखाना परिसरात लावलेली भारतीय मूळ झाडं या पक्ष्यांसाठी वरदान ठरलेली आहेत. कारखाना निर्मितीच्या वेळी परिसरात सिरस, निंब, चिंच, बहावा, वड, पिंपळ, पिंपरण, करंज, चाफा, पळस, पांगारा, आंबा, चिकू, जांभूळ, भोकर आदी भारतीय मूळ झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक ठरली आहेत. 

अशी आहे येथील पक्ष्यांची दिनचर्या... 
संध्याकाळ झाली की विशेष करून नीरा नदीच्या बाजूने विविध पक्ष्यांचे लहान-मोठे थवे कारखाना परिसराकडे उड्डाण करत येताना दिसतात. गायबगळे, पाणकावळे, साळुंकी, पोपट, भोरड्या, वेडाराघू, पांढरे कुदळ्या (शराटी) हे पक्षी मोठ्या संख्येने मुक्कामाला येतात. मुक्कामाला आलेल्या पक्ष्यांचे वृक्षराजीवर बसण्याचे स्थान ठरलेले असते. गायबगळे, पाणकावळे, राखी बगळे हे मोठ्या संख्येने जुन्या शिरसच्या झाडांवर आपला डेरा टाकतात. पिंपळ व वडाच्या झाडांच्या हिरव्यागार पानांच्या आडोशात पोपट व साळुंकी लपून राहून रात्र घालवतात. पक्षी मुक्कामाला आल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी बसल्यावर काही वेळासाठी मोठ्या आवाजात कलकलाट करत राहतात आणि अंधार दाटल्यावर चिडीचूप होऊन निद्रिस्त होतात. पहाट झाली की जागे होऊन चिवचिवाट करत दाही दिशांकडे अन्नाच्या शोधार्थ निघून जातात. 

माळीनगर येथील कारखाना परिसरातील हे मोठे सारंगगार फार जुने आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी या ठिकाणी मुक्कामाला येणाऱ्या विविध पक्ष्यांच्या सवयींचा अभ्यास करतो आहे. हे सारंगगार सोलापूर जिल्ह्यातील पक्ष्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण व वैभवशाली आहे. सध्या तरी हे सारंगगार बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित आहे, ही जमेची बाजू आहे. 
- डॉ. अरविंद कुंभार,
पक्षी अभ्यासक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bird sanctuary at Malinagar is protected from bird flu