खंडणी प्रकरण : भाजप नगरसेवकांकडून उपमहापौरांना घरचा आहेर ! नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी

अमोल व्यवहारे 
Thursday, 31 December 2020

उपमहापौर राजेश काळे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी महापालिकेतील भाजपच्याच नगरसेवकांनी काळे यांचे वर्तन हे पक्षाला शोभणारे नसल्याच्या प्रतिक्रिया देत घरचा आहेर दिला. 

सोलापूर : उपमहापौर राजेश काळे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी महापालिकेतील भाजपच्याच नगरसेवकांनी काळे यांचे वर्तन हे पक्षाला शोभणारे नसल्याच्या प्रतिक्रिया देत घरचा आहेर दिला. उपमहापौर काळे यांनी उपायुक्‍त डॉ. धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याबाबतचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर काळे यांच्या पक्षातीलच नगरसेवकांकडून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. 

काळे यांचे नगरसेवक पद रद्द करून पक्षातून त्यांची हाकलपट्टी करा... 
भाजप हा डोक्‍यावर बर्फ, तोंडात खडीसाखर आणि पायाला भिंगरी असलेला पक्ष आहे. प्रशासन हे सत्ताधारी पक्षाचे असते. उपमहापौर राजेश काळे यांचे वर्तन हे निषेधार्ह आहे. आम्ही त्यांच्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करीत आहोत. पालिकेच्या आयुक्‍तांनी काळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पक्षाकडेही आम्ही काळे यांचे नगरसेवक पद रद्द करून त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यासाठी अध्यक्षांकडे मागणी करू. 
सुरेश पाटील, 
ज्येष्ठ नगरसेवक, भाजप 

राजेश काळे यांची उपमहापौरपदी निवड झाल्यानंतरच शहराचे एंटरटेनमेंट करतील असे भाकित आम्ही यापूर्वीच केले होते, त्या पद्धतीने काळे याचे वर्तन होत आहे. काळे यांच्या वर्तनाबाबत पक्षश्रेष्ठींकडे विषय मांडून यामध्ये बदल व्हायला पाहिजे, याबाबत पक्षाकडे आग्रह धरू. देशात सत्तेवर असलेल्या पक्षाला काळीमा फासणाऱ्या व्यक्तीस पदावरून बदलण्याची मागणी पक्षाकडे करू. 
नागेश वल्याळ, 
नगरसेवक, भाजप 

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन 
भाजपच्या उपमहापौरांनी पालिका उपायुक्‍तांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केल्याप्रकरणाचे बुधवारी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिसाद उमटले. पालिकेतील सर्व अधिकार-कर्मचाऱ्यांनी बुधवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तर सोलापूर महानगरपालिका कामगार कृती संघटनेच्यावतीने याप्रकरणात गंभीर व कडक कारवाई करण्याचे निवेदन पोलिस आयुक्‍तांना दिले. 

सोलापूर महापालिकेतील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी पालिकेचे उपायुक्‍त डॉ. धनराज पांडे यांना फोन करून अंत्यत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना धमकी दिली. यावेळी काळे यांनी पालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, विभागीय अधिकारी मठपती यांनाही शिवीगाळ करून धमकी दिली व खंडणी मागितली. याप्रकरणी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपायुक्‍त डॉ. धनराज पांडे यांच्या फिर्यादीवरुन उपमहापौर राजेश काळे यांच्याविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ प्रकरणाचे पडसाद बुधवारी महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. बुधवारी सकाळी महापालिका कौन्सील हॉलच्या प्रवेशद्वारासमोर महापालिकेतील सर्वच कामगार संघटनांनी एकत्रित येऊन उपमहापौर राजेश काळे यांच्या प्रवृत्तीचा तीव्र निषेध व्यक्त केला. याप्रसंगी पालिका आयुक्‍तांसह सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावल्या. नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी अशा स्वरूपातील घोषणांनी पालिकेचा परिसर दणाणून गेला होता. 
यावेळी कामगार संघटनांनी महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांच्याकडे गुंडगिरी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पक्षात का ठेवता, त्यांना त्वरीत पक्षातून निलंबित करा अशी मागणी केली. यावेळी उपायुक्‍त समीर लेंगरेकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव, माऊली पवार, प्रदीप जोशी, बाबा क्षिरसागर, बाली मंडीपो, अजय क्षिरसागर, चांगदेव सोनवणे, बापू सदाफुले, भारत क्षीरसागर, उमेश गायकवाड, शिवाजी कांबळे, कासार यांच्यासह अधिकारी-कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आंदोलन सुरू असतानाच चौकशी 
आंदोलन सुरू असतानाच चौकशीसाठी सदर बझार पोलिस स्टेशनचे पोलिस महापालिकेत आले. या वेळी पोलिसांनी उपमहापौर काळे यांच्या कार्यालयातील कर्मचारी व काही सामान्य नागरिकांची चौकशी केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP corporators demand cancellation of Deputy Mayor Kales post