कृतज्ञता...सोलापुरात घरोघरी रक्तदान शिबिर (VIDEO)

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 26 मार्च 2020

देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व गटातील रक्ताची नितांत गरज आहे. त्यामुळे अशा शिबिरांच्या आयोजनाची गरज आहे. या शिबिरांमुळे शहरातील विशेषतः शासकीय रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांची गरज भासणार आहे.
- बाबा मिस्त्री, नगरसेवक

सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचवेळी शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. मात्र सध्या रक्तदान शिबिरांचे आयोजनही बंद असल्याने अडचण झाली आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक आणि लोकं बसली आहेत
रक्तदान करण्यापूर्वी तपासणी करताना गोयल कुटुंबियांतील महिला 

सोलापुरात रक्तदानाची गरज असल्यासंदर्भात सकाळ मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर अनेक रक्तदात्यांनी विविध रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील प्रसिद्ध व्यापारी माणिक गोयल आणि नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी आपल्या घरांमध्येच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तपिशव्या संकलित झाल्या आहेत. 

गोयल परिवारामध्ये जवळपास 52 सदस्य आहेत. त्यापैकी स्त्री व पुरुष मिळून 40 जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये कुटुंबातील तरुणांपासून ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रक्तदान करताना या सर्वांच्या चेहऱ्यावर रक्तदान केल्याने होणारे समाधान झळकत होते. गोयल यांनी आपल्या घराच्या परिसरातच या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये 
गोयल कुटुंबियांसह त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवारातील सदस्यांनीही उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. 

सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक बाबा मिस्त्री यांनीही आपल्या घरातच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात 46 जणांनी रक्तदान केले. शासकीय रग्णालयात रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. नई जिंदगी परिसरात मोठ्या संख्येने रक्तदाते आहेत. या सर्वांनी शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. गरज भासल्यास आणखी दोन ते तीन
वेळा रक्तदान शिबिर भरविण्याचे नियोजन श्री. मिस्त्री यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आम्ही देशाप्रती कृतज्ञता म्हणून गोयल कुटुंबातील सर्वच सदस्यांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. सोलापुरातील विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही गर्दी टाळून रक्तसंकलनासाठी प्रयत्न करावेत.
- माणिक गोयल, उद्योजक

चला पाहुया (VIDEO)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blood donetion camp in solapur city at home