नकली सोने गहाण ठेवून कर्जदारांनीच केली फायनान्स बॅंकेची दीड कोटींची फसवणूक 

प्रशांत काळे
Tuesday, 14 July 2020

230 प्रकरणातील सोने बनावट 
बार्शी शाखेच्या लेखापरिक्षणात व तपासणीमध्ये 230 कर्जप्रकरणांच्या तपासणीमध्ये 82 पाकीटांमधील तारण ठेवलेले सोने योग्य दर्जाचे होते तर 3 पाकिटातील सोने अंशतः बनावट, अंशतः खरे होते. 145 पाकीटातील तारण ठेवलेले सोन्याचे दागिने संपूर्ण बनावट असल्याचा अहवाल 18 जून 2020 रोजी लेखापरीक्षकांनी दिला. त्यावरून कर्जदारांशी संगनमत करून बॅंकेने नेमलेल्या पाच जणांनी 148 प्रकरणांतील बनावट सोने तारण ठेवून बॅंकेची 

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहरातील जना स्मॉल फायनान्स बॅंकेत बनावट सोने ठेवून 148 कर्जदारांनी 1 कोटी 42 लाख 90 हजार 797 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनीच संगनमत करुन कर्जवाटप केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एकास अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकारी आर. एस. दडके यांनी 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 
एम. व्ही. अनील (वाघाडकर व्हल्युएटर्स प्रा.लि. ठाणे), दयानंद एकनाथ महामुनी (रा. वालवड, ता. भूम, जि. उस्मानाबाद), बाबासाहेब तानाजी जाधव (रा. कळंबवाडी, ता. बार्शी), मिलिंद पवार (व्हल्युअर असोसिएट्‌स नाशिक), प्रविण भिमाशंकर महामुनी (रा. सलगर गल्ली, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बॅंकेचे व्यवस्थापक अमोल कुलकर्णी यांनी 11 जुलै रोजी फिर्याद दाखल केली. ही घटना 22 मे 2019 ते 18 जून 2020 दरम्यान घडली. 
औरंगाबाद येथील शाखेत बॅंकेने नेमलेल्या सोने व्हलुएटरने कर्जदारांशी संगनमत करुन बनावट सोने तारण ठेवून कर्ज काढल्याचे उघडकीस आले. त्यामुळे व्यवस्थापनाने सर्वच शाखांचे तारण ठेवलेल्या सोन्याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बार्शी शाखेतील सोन्याची तपासणी करण्यात आली. 
बार्शी शाखेच्या लेखापरिक्षणात व तपासणीमध्ये 230 कर्जप्रकरणांच्या तपासणीमध्ये 82 पाकीटांमधील तारण ठेवलेले सोने योग्य दर्जाचे होते तर प्रत्येकी 3 पाकिटातील सोने अंशतः बनावट, अंशतः खरे होते आणि 145 पाकीटातील तारण ठेवलेले सोन्याचे दागिने संपूर्ण बनावट असल्याचा अहवाल 18 जून 2020 रोजी लेखापरीक्षकांनी दिला. त्यावरून कर्जदारांशी संगनमत करून बॅंकेने नेमलेल्या पाच जणांनी 148 प्रकरणांतील बनावट सोने तारण ठेवून बॅंकेची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्हा दाखल होताच सोमवारी दयानंद एकनाथ महामुनी याला पोलिसांनी अटक केली. त्याला बार्शी न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Borrowers cheated Finance Bank to the tune of Rs one crore 42 lakh by keeping fake gold