गांजा घेऊ नको म्हणणाऱ्या बापाला मुलानेच मारले ! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी 

3244crime_logo_525_1_5_7.jpg
3244crime_logo_525_1_5_7.jpg

सोलापूर : गांजा पिण्यासाठी पैसे मागून शिवीगाळ केल्याप्रकरणी मुलानेच बापाच्या डोक्‍यात कोयता घालून गंभीर जखमी केले आहे. ही घटना घोंगडे वस्ती, भवानी पेठेत घडली आहे. रोहीत रेवण शिरसागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रेवण मारुती शिरसागर यांनी फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. वडिल घरी झोपले असताना त्यांचा मुलगा घरी आला आणि फिर्यादीच्या पत्नीला गांजा पिण्यासाठी 30 रुपये मागितले. त्यावेळी रेवण यांना जाग आली. त्यावेळी रोहित हा आईसोबत पैशासाठी वाद घालत होता. त्यावेळी रोहीतच्या पत्नीने शंभर रुपये दिले. पैशावरुन त्याने शिवीगाळ केली. फिर्यादी रेवण यांनी रोहितला समजून सांगत असताना त्याने वडिलांच्या तोंडावर मारहाण केली. त्यानंतर घरातील लोखंडी कोयता डोक्‍यात मारून गंभीर जखमी केले, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

शासकीय कामात अडथळाप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा 
सोलापूर : शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी एक जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयपूर रोडवरील संत रोहिदास चौक परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद तस्लिम रसूल जामखान (रा. बाबाखॉं, कृष्णानगर, दखिवारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील हे विजयपूर रोडवर जड वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होते. त्यावेळी भरधाव वेगाने एक ट्रक समोरुन येताना त्यांना दिसला. त्यावेळी त्यांनी तो अडविला. त्यानंतर ट्रकचालकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


घरासमोर प्रात:विधीस बसल्यावरुन मारहाण 
सोलापूर : घरासमोर लहान मुले प्रात: विधीस बसल्याच्या रागातून दगड व विटाने मारहाण केल्याची घटना गंगाधर नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मथुरा अर्जून गुंड (रा. गंगाधर नगर, सुतमिलमागे) यांनी फिर्याद दिली आहे. प्रात:विधीस बसलेल्या चिमुकल्यांना थोडे लांब जाऊन बसा, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून घरासमोरील काही लोकांनी जमाव जमवून मथुरा यांना घरातून बाहेर ओढले. त्यानंतर हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्या भांडणात गळ्यातील सोन्याचे दागिने व कानातील कर्णफूले गहाळ झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


घाणवट ठेवलेल्या गाडीच्या वादातून मारहाण 
सोलापूर : पैशाच्या व्यवहारातून गहाण ठेवलेली गाडी घेऊन फिरण्याच्या वादातून सेटलमेंट परिसरात हाणामारी झाली. त्यात तिघे जखमी झाले असून परस्परविरोधात पाच जणांविरूध्द सलगरवस्ती पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषी सुरेश पवार (रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलाने दारु पिण्याच्या नादात दुचाकी सुरी या व्यक्‍तीकडे गहाण ठेवली. दुचाकी घेऊन येण्यासाठी संतोषी व त्यांची मुलगी त्या व्यक्‍तीकडे गेल्या. त्यावेळी सागर चंद्रकांत गायकवाड, प्रेम चंद्रकांत गायकवाड (रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी) यांनी संतोषी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्या दोघी घरी आल्यानंतर त्या तिघांनी घरात घुसून मारहाण केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. तर प्रेम गायकवाड याच्या फिर्यादीनुसार गहाण ठेवलेली दुचाकी का वापरतो म्हणून प्रविण सिद्राम जाधव, सुरेश पवार, अजय यल्लप्पा गायकवाड (सर्वजण रा. सेटलमेंट) यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. 


बिहारच्या संशयित आरोपीला अटक 
सोलापूर : विजापूर नाका पोलिस ठाण्याअंतर्गत औद्योगिक चौकी परिसरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तरुणाने पलायन केले. त्यानंतर मुलीच्या आईने विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली, मात्र त्या तरुणाबद्दल मुलीसह तिच्या आईला काहीच माहिती नव्हते. तरीही पोलिसांनी टेक्‍निकल सपोर्टद्वारे त्या तरुणाचा शोध घेतला. तो बिहारला पळून गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी शक्‍कल लढवून त्याला सोलापुरात येण्यास भाग पाडले. तो सोलापुरात येताच पोलिसांनी त्याला अटक केल्याचे विजापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले. 


शहर पोलिसांकडून 
पावणेनऊ लाखांचा दंड वसूल 

सोलापूर : शहरात विनामास्क फिरणाऱ्यांसह बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी सातत्याने कारवाई सुरु केली आहे. 17 ऑगस्टपासून पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 9 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिसांनी शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांसह विनापरवाना तथा नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविणाऱ्यांना दंड ठोठावला आहे. त्यांच्याकडून आठ लाख 85 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलिस आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 


दुकानाच्या गल्ल्यातून 15 हजार लंपास 
सोलापूर : कस्तुरबा मार्केट परिसरातील प्रवीण टेडर्स या किरणा दुकानाच्या गल्ल्यातून चोरट्याने 15 हजार रुपये चोरुन नेले आहेत. या प्रकरणी प्रवीण अमृत करंडे (रा. होमकर वस्ती, भवानी पेठ) यांनी जोडभावी पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरट्याने दुकानाचा लोखंडी पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि पैसे चोरले, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला असून पोलिस नाईक मुजावर हे पुढील तपास करीत आहेत. 


घरगुती गॅस ऑटोरिक्षात भरणाऱ्याला पकडले 
सोलापूर : घरगुती गॅसचा वापर अवैधरित्या ऑटोरिक्षात भरणाऱ्या तिघांविरुध्द विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अजिम मैनोद्दीन नाईकवाडी (रा. विजय नगर, मजरेवाडी), अफसर जाकीर शेख (रा. उत्तर सदर बझार) आणि जमी काझी (रा. सितारा चौक, नई जिंदगी) यांचा समावेश आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित आरोपींकडून तीन गॅस टाक्‍या, एक इलेक्‍ट्रिक वजन काटा, इलेक्‍ट्रिक मोटार, इलेक्‍ट्रिक बोर्ड असलेली वायर आणि ऑटोरिक्षासह (एमएच- 13, बीव्ही- 4786) एक लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com