
शहरातील महावीर नगरमधील ऍपेक्स हॉस्पिटल समोरील फर्निचर व्यापारी अजित फडे यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी 15 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. ही चोरी 1 डिसेंबर ते 13 डिसेंबर या दरम्यानच्या काळात घडली.
पंढरपूर (सोलापूर) : शहरातील महावीर नगरमधील ऍपेक्स हॉस्पिटल समोरील फर्निचर व्यापारी अजित फडे यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी 15 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. ही चोरी 1 डिसेंबर ते 13 डिसेंबर या दरम्यानच्या काळात घडली. भर बाजारपेठेतील बंगल्यातून झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, येथील महावीर नगरमधील ऍपेक्स हॉस्पिटलसमोर अजित फडे यांचा बंगला असून, खालील बाजूस फर्निचरचे दुकान आहे. त्यांची मुलगी मधुरिमा ही शिक्षणासाठी पुणे येथे असते. लॉकडाउनमुळे गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून ती पंढरपूर येथील घरी राहात होती. 9 डिसेंबर रोजी फिर्यादी संजीवनी अजित फडे आणि त्यांचे पती अजित फडे हे मधुरिमा हिला पुणे येथे सोडण्यासाठी गेले होते.
13 डिसेंबर रोजी सायंकाळी ते पंढरपूरला परत आले, तेव्हा त्यांना घरातील फ्रिजमधील चांदीचा जार दिसला नाही; तसेच घरातील कपाटावरील साडी खाली पडलेली दिसून आली. सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 15 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाला असल्याचे लक्षात आले. सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम फडे कुटुंबीयांनी 1 डिसेंबर रोजी पाहिली होती. त्यामुळे 1 डिसेंबर ते 13 डिसेंबर या दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी फडे कुटुंबीयांची नजर चूकवून रोख रक्कम आणि दागिने पळवून नेले असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी अजित फडे यांच्या पत्नी संजीवनी फडे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार व अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली आहे. भर बाजारपेठेतील बंगल्यातून चोरी झाल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल