esakal | करमाळा तालुक्‍यातील गावांमध्ये भर दुपारी पाच ठिकाणी घरफोडी 
sakal

बोलून बातमी शोधा

Burglary at five places in the afternoon in the villages of Karmala taluka

करमाळा तालुक्‍यात आज भर दिवसा घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनांचा लवकरात लवकर तपास लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

करमाळा तालुक्‍यातील गावांमध्ये भर दुपारी पाच ठिकाणी घरफोडी 

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात सोमवार (ता. 7) रोजी भर दुपारी पाच ठिकाणी घरफोडी करण्यात आली आहे. भर दिवसा घरफोडीचे प्रकार घडल्याने करमाळा तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. वीट, विहाळ, भोसे येथे हे घरफोडीचा प्रकार घडले आहेत. या तिन्ही गावात दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान या घटना घडल्या. 

घरफोडी झालेले तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेले असता फिर्याद देण्यासाठी संबंधितांना उद्या बोलवण्यात आले आहे. तर घरफोडीचा तपास तात्काळ व्हा, अशी मागणी संतोष दिनकर ढेरे यांनी केली आहे. वीट येथील भैरवनाथनगरमधील प्रकाश दिनकर ढेरे, संतोष दिनकर ढेरे या दोन्ही भावाची घरे फोडली आहेत. येथे घर फोडून लहान मुलांची कंबरेची चांदीची चेन व कानातील सोन्याचे कुडके चोरी गेली आहेत. तर विहाळ येथील बाळासाहेब काशीनाथ बंडगर यांचे गावातील घर दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कुलूप तोडून घरातील चोरी करत असताना कशाचा आवाज येत आहे म्हणून शेजारील एका महिलेने पाहिले असता दुचाकीवर दोन तरुण तोंडाला काळे बांधलेले दिसून आले. यावेळी या महिलेने संबंधितांना विचारले असता आम्ही पाहुणे आहोत, असे म्हणून त्यांनी पळ काढला. तर भोसे येथील सुरवसे वस्तीवरील बापू यशवंत सुरवसे यांच्या घराचे कुलूप व दारवाजा तोडून 15 हजार रुपये व पाच ग्रॅम सोने व चांदीचे पैंजण चोरी केले आहे. या गावातील सुदाम यादव सुरवसे यांच्या घराचे कुलूप व दार तोडले कपाट फोडले आहेत. तालुक्‍यात भर दिवसा घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी याचा तपास लावावा, अशी मागणी केली जात आहे. 

संपादन : वैभव गाढवे