ओढ्याच्या पुरात वाहून गेलेली कार तिसऱ्या दिवशी सापडली; गाडीतील चार जणांचा मृत्यू 

अण्णा काळे 
Friday, 16 October 2020

करमाळा तालुक्‍यात बुधवारी (ता. 14) झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरात जेऊर-लव्हे रस्त्यावरील पुलावरून एक कार वाहून गेली होती. ती वाहून गेलेली कार सापडली असून या कारमधील चारही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडील, मुलगा व अन्य दोघे असल्याचे समजते.

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात बुधवारी (ता. 14) झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरात जेऊर-लव्हे रस्त्यावरील पुलावरून एक कार वाहून गेली होती. ती वाहून गेलेली कार सापडली असून या कारमधील चारही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडील, मुलगा व अन्य दोघे असल्याचे समजते. ही गाडी निंभोरे (ता. करमाळा) येथून पुण्याला चालली होती. मृत पावलेले तिघे करमाळा तालुक्‍यातील वरकटणे येथील तर एकजण खडकेवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

वाहून गेलेल्या कारचा क्रमांक एमएच 14 एफसी 3970 आहे. शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजता ही कार सापडली असून, ती क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. 

बुधवारी या येथील पुलावरून एक चारचाकी गाडी वाहून गेल्याचे ग्रामस्थ सांगत होते. मात्र ओढ्याला मोठ्या प्रमाणावर आलेल्या पुराने गाडी कुठेच दिसत नव्हती. ओढ्यावरील पुलावरून सात ते आठ फूट पाणी वाहत होते. बुधवारी खूप मोठ्या प्रमाणावर ओढ्याला पूर होता. कालपासून या गाडीचा शोध सुरू होता. मात्र गाडी सापडत नव्हती. गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती दिल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी ग्रामस्थ व प्रशासनाच्या वतीने वाहून गेलेल्या गाडीचा शोध सुरू केला असता ही गाडी सापडली आहे. क्रेनच्या सहाय्याने ही गाडी काढली आहे. गाडी पुलाजवळच अडकली होती. या गाडीत चार प्रवासी होते. गाडीतील चारही जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The car which was swept away by the floodwaters was found on the third day