विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के ! मंगळवेढ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा; कुठे अन्‌ कसा झाला असेल गैरवापर?

हुकूम मुलाणी 
Thursday, 28 January 2021

संशयित आरोपी सर्वेश्वर दामू शेजाळ हा शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी 35 लाखांचे दागिने चोरल्याप्रकरणी अटकेत आहे. याचा तपास चालू असताना 22 जानेवारी रोजी दुपारी 12 पूर्वी ते मागील दहा वर्षांपासून तो अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के जवळ बाळगल्याचे समोर आले आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : कार्यकारी दंडाधिकारी यांचा राजमुद्रेसह असणारा गोल शिक्का बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी सर्वेश्वर दामू शेजाळ (रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा) व शिक्का तयार करणारी महिला अशा दोघांविरुद्ध भा. दं. वि. 473, 34 प्रमाणे मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेची हकीकत अशी, की यातील संशयित आरोपी सर्वेश्वर दामू शेजाळ हा शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी 35 लाखांचे दागिने चोरल्याप्रकरणी अटकेत आहे. याचा तपास चालू असताना 22 जानेवारी रोजी दुपारी 12 पूर्वी ते मागील दहा वर्षांपासून तो अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के जवळ बाळगल्याचे समोर आले आहे.

यात गोणेवाडी ते मंगळवेढा शहर तसेच गोणेवाडी येथील गावकामगार तलाठी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, मंगळवेढा तहसीलदार, जनमाहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार, गावकामगार पोलिस पाटील, सांगोला कडलास नाका येथील सायबर कॅफे अँड झेरॉक्‍स स्टेशनरी, ओम सायबर कॅफे, नाशिक येथील असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, मंगळवेढा येथील जयश्री उत्तम माने विशेष कार्यकारी अधिकारी, मुंबई बोरिवली येथील ओम झेरॉक्‍स अँड स्टेशनरी, गोणेवाडी ग्रामपंचायतीचा गोल शिक्का असे विविध शिक्के व स्टॅंप संशयित आरोपी शेजाळ याच्याकडे असल्याचे चौकशीत उघड झाले. 

यानंतर हे सर्व शिक्के बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने नकली शिक्के मंगळवेढा येथील किल्ला भागात शिक्का तयार करणाऱ्या महिला मोडक हिने आरोपीकडून कोणतेही कायदेशीर पत्र न घेता त्यास शिक्के बनवून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे बनावट शिक्के तयार करून देणाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे नकली शिक्के बनवून घेऊन आरोपीने बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बामणे हे करीत आहेत. 

या बनावट शिक्‍क्‍यांचा वापर कुठे-कुठे करण्यात आला असेल? 
संशयित आरोपीने या सरकारी व प्रशासकीय शिक्‍क्‍यांचा वापर कुठे व कसा केला, हे मात्र गुलदस्त्यात आहे. याचा कसून तपास केल्यास अनेक गैरप्रकार उघडकीय येण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against them for possessing fake stamps of various administrative officials