उमेदवारी अर्जासोबत आता जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 25 मार्च 2020

अनेकांची होणार अडचण 
उमेदवारी अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने आता अनेक इच्छुकांची अडचण होणार आहे. अर्ज दाखल करताना अनेकजण वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती दाखल करतात. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक झाल्याने इच्छुकांना सर्व तयारीनिशीच मैदानात उतरावे लागणार आहे. अन्यथा उमेदवारी अर्जच नाकारला जाण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता उमेदवारी अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सवलत देण्याच्या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यातील नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबवली आणि कोल्हापूर या पाच महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 5 ब मधील तरतुदीनुसार जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबतच जोडणे बंधनकारक आहे. मात्र, जातवैधता प्रमाणपत्र देण्याच्या कालावधीसाठी शासनाने वेळोवेळी सवलत दिली आहे. अधिनियम 21 द्वारे देण्यात आलेल्या सवलतीची मुदत 30 जून 2019 पर्यंत लागू होती. या सवलतीलाही 30 जून 2020 पर्यंत वाढ देण्यात आली. मात्र, या अध्यादेशाचे रूपांतर अधिनियमात झाले नाही. त्यामुळे आता राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्यांना उमेदवारी अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक झाले आहे. 

या निर्णयामुळे राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता जात प्रमाणपत्र अगोदरच काढून घेणे आवश्‍यक झाले आहे. त्यासाठीची आवश्‍यक प्रशासकीय प्रक्रिया करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावीत यासाठी जिल्हाधिकारी आता प्रसिद्धीकरण करणार आहेत. इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज आले की ते तत्काळ जात पडताळणी समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या अर्जात काही त्रुटी आढळून आल्यास त्या दूर करण्याबाबतची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घेतली जाणार आहे. 

चला वाचू या राज्य निवडणूक आयोगाचा अध्यादेश

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: मजकूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cast validity certificate coumpalsari with nomination form for local body government election