esakal | मंगल कार्यालये ओस तर आचारी, बॅंड, घोड्यावाले, फुलवाल्यांची उपासमार 
sakal

बोलून बातमी शोधा

chefs, bands, florists, horsemen's Starvation and wedding hall off

यंदा एकही समारंभ झाला नाही 
या लग्नसराईतील जवळजवळ सर्वच तारखा लग्नासाठी बुकिंग केल्या होत्या. परंतु, आतापर्यंत या काळात एकही समारंभ झाला नाही. तसेच आम्हाला या परिस्थितीतही व्यवस्थापनाचा खर्च करावा लागत आहे. लॉकडाऊनमूळे आम्हाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. 
- अभिजीत नलवडे, मालक, साई गणेश मंगल कार्यालय 

मंगल कार्यालये ओस तर आचारी, बॅंड, घोड्यावाले, फुलवाल्यांची उपासमार 

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : कोरोनाचा सामना करण्यासाठी सध्या लॉकडाउन व संचार बंदी करण्यात आली आहे. या काळात लग्नकार्येच होत नसल्याने यावर आधारित सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. मंगल कार्यालये ओस पडली असून आचारी, बॅंडवाले, घोडा वाले, निवेदक, फुलवाले यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. 'सांगा, आम्ही आता जगायचं कसं..!' एवढे एकच वाक्‍य ते भावनावश होवून बोलत आहेत. 
कोरोनाचे सावट संपूर्ण जगसह भारतावरही पसरले आहे. संपूर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉक डाऊन व संचारबंदी करण्यात आली आहे. या संचार बंदीचा फटका सर्वच उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणात होत आहे. या काळात लग्नकार्य होत नसल्याने यावर आधारित असणारे सर्व उद्योग, व्यवसायिक ठप्प झाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून उभारलेली मंगल कार्यालये कोरोना संकट काळात ओस पडली आहेत. लग्नसमारंभ होत नसले तरी मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाचा खर्च सध्याच्या काळात मालकांनाच करावा लागत आहे. लग्नकार्यासाठी मंगल कार्यालयात येणारे बॅंडवाले, आचारी, फुलवाले, निवेदक, घोडा वाले यांवर आजच्या परिस्थितीत अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभरातून फक्त विवाह काळातच यांच्या हाताला काम मिळत असल्याने ते वर्षभराची आपली रोजीरोटी या काळातच मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु सध्या लग्नकार्येच होत नसल्याने अशा व्यवसायिक मजुरांवर यापुढे खायचे काय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. विवाह तारखा संपत आल्याने व यापुढेही विवाह कार्ये होतीलच हे सांगता येत नसल्याने वर्षभर आपल्या कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर सतावतो आहे. 'हा कोरोना आला कुठून व जाणार कधी सांगता येत नाही. सांगा, आम्ही आता जगायचं कसं..!' असे ते भावनावश होऊन बोलत आहेत. 

घोड्यांना कामच नाही 
माझ्याकडे समारंभासाठी दोन घोडे आहेत. सध्या लग्नकार्ये नसल्याने घोड्यांना काहीच काम नाही. परंतु दोन घोड्यांचा दररोजचा खर्च 500 ते 700 रुपये येतो अशा परिस्थितीत घोड्याला कसे जगवायचे व आम्ही कसे जगू हा मोठा प्रश्न आहे. 
- प्रशांत जाधव, घोडेवाले, मेथवडे, ता. सांगोला 

संचारबंदीमुळे आर्थिक फटाका 
लग्न कार्याबरोबरच सर्वच समारंभात मी निवेदीकेचे काम करते. कोरोनाच्या संकटामुळे सध्या कोणतेच समारंभ होत नाहीत. या संचार बंदीच्या काळात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 
- माधुरी जाधव, निवेदिका, सांगोला 

हाताला कोणतेच काम नाही 
लग्न कार्याबरोबरच सर्वच कार्यक्रमात आचाऱ्याचे काम करतो. परंतु सध्याच्या काळात आमच्या हाताला कोणतेच काम नाही. सध्या मी घरीच असून आमच्याकडे दुसरे उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. या कोरोनामुळे आमच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. 
- किसन महाराज, आचारी, सध्या सांगोला (मुळ - राजस्थान)