आजीआजोबांच्या गोष्टीत रमली शहरातील नातवंडे 

रमेश दास 
रविवार, 5 एप्रिल 2020

राज्यात कोरोना पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दीर्घकाळाचा लॉकडाउन लागू केल्याने सर्व शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे एरवी शहरातील शाळेत असलेली लहान मुले, मुली आपल्या मूळगावी गेली असून, पुन्हा एकदा घरासमोर अंगणात आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकत आहेत. कुठे आजीबरोबर जाते ओढताना जात्यावरील गोड ओव्या ऐकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यात येत आहे. 

वाळूज (सोलापूर) :लॉकडाउनमधील सुट्यांमुळे शहरातून गावाकडे आलेली नातवंडे आजी-आजोबांच्या मजेदार गोष्टी, बैलगाडीतून शेतातील फेरफटका आणि जात्यावरच्या "ओव्यात' रमून गेल्याचे चित्र खेडोपाडी पाहण्यात येत आहे. 
राज्यात कोरोना पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दीर्घकाळाचा लॉकडाउन लागू केल्याने सर्व शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे एरवी शहरातील शाळेत असलेली लहान मुले, मुली आपल्या मूळगावी गेली असून, पुन्हा एकदा घरासमोर अंगणात आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकत आहेत. कुठे आजीबरोबर जाते ओढताना जात्यावरील गोड ओव्या ऐकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यात येत आहे. 
जात्यांनाही आता "कंठ फुटले' असून जातं ओढणाऱ्या "सुरकुतलेल्या' आजीच्या हाताला नातवांच्या हाताचा "आधार' मिळाला आहे. गावागावातून जात्यावरील ओव्यांचे सूर ऐकायला येऊ लागले आहेत. 
"दळण दळयती, सोन्याच्या हातायनं, 
भाग्यवंताच्या जात्यायनं... 
दळण दळयती, पदर हाय माथ्यावरी, 
आवुक मागणी जात्यावरी...!" 
अशा ओव्या ऐकवून सांगितल्या जात आहेत. 
याबाबत पोखरापूर (ता. मोहोळ) येथील कुसुम वामन खंदारे व त्यांचे पती वामन खंदारे यांनी सांगितले की, जात्यावरच्या ओव्या, राजा राणीच्या, इसापनितीच्या तसेच थोर पुरुषांच्या गोष्टी शहरीकरणामुळे आता दुर्मिळच झाले आहे. 
गावाकडची शेती, गायी-म्हशी, बैलगाडी, शेतातील विविध पिके, पिकांवर बसणारे पक्ष्यांचे थवे, मधमाशांच्या पोळ्यातील मध, हरणांचा कळप, सशाच्या पायांच्या ठश्‍यांवरून त्याचा माग काढणं, नदी-ओढ्याकाठच्या बोरी, जांभळी, उंबरं, शिंदोळ्यांची अवीट गोडीचा अनुभव नव्या पिढीला माहीत नाही. 
पूर्वी गव्हा-ज्वारीची दळणं, सगळ्या प्रकारच्या डाळी जात्यावरच कराव्या लागत. तासन्‌तास जातं ओढावं लागायचं, कंटाळा येऊ नये, काम सोपं वाटावं याकरिता दळताना "ओव्या' गायल्या जात. त्या कुठं लिहून ठेवलेल्या नसत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं तो मौखिक असलेला सांस्कृतिक ठेवा जपला जायचा, असे कुसुम खंदारे यांनी सांगितले. 

नव्या पिढीला माहीत होण्यासाठी मिलाफ व्हावा
गावगाड्यातील जातं, ओव्या, धनगरी गज्जे, बैलगाडी, ग्रामीण मैदानी खेळ, लेझीम, दिवाळीत निघणारी सोंगं, शेतीची कामं, सुगीची खळी हे सारं नव्या पिढीला माहीत होण्यासाठी आजी- आजोबा आणि नातवंडांचा मिलाफ व्हावा. 
-प्रा. श्रीधर उन्हाळे, जय जगदंबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पोखरापूर (ता. मोहोळ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children enjoy listening to things in the rural areas of Solapur district