esakal | दोन टक्‍के कमी दरात "चिमणी'ची वाटाघाटी ! मक्ता मंजुरीचा प्रस्ताव जाणार सर्वसाधारण सभेकडे 

बोलून बातमी शोधा

Siddheshwar_Chimney}

प्रवासी विमानसेवेला अडसर असलेल्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा मक्ता देण्याबाबत शुकवारी महापालिकेत निविदाधारकांशी वाटाघाटी झाली. चर्चेअंति दोन टक्के कमी दरात पाडकाम करण्याची तयारी निविदाधारकाने दर्शविली. 

दोन टक्‍के कमी दरात "चिमणी'ची वाटाघाटी ! मक्ता मंजुरीचा प्रस्ताव जाणार सर्वसाधारण सभेकडे 
sakal_logo
By
वेणुगोपाल गाडी

सोलापूर : प्रवासी विमानसेवेला अडसर असलेल्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा मक्ता देण्याबाबत शुकवारी महापालिकेत निविदाधारकांशी वाटाघाटी झाली. चर्चेअंति दोन टक्के कमी दरात पाडकाम करण्याची तयारी निविदाधारकाने दर्शविली. दराबाबत महापालिका प्रशासन व निविदाधारकात एकमत झाल्यानंतर मक्ता मंजूर करण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

चिमणी पाडण्याबाबत महापालिकेने ई-निविदा मागविली होती. यासाठी रेहान, मल्लिकार्जुन वस्त्रद, शालिमार कन्स्ट्रक्‍शन व ट्रॅव्हल्स तसेच बिनियास कॉटेक अशा एकूण चार जणांनी निविदा भरली होती. निविदा उघडल्यांनतर रेहान, मल्लिकार्जुन वस्त्रद, शालिमार कन्स्ट्रक्‍शन व ट्रॅव्हल्स या तिघांना कामाचा अनुभव नसल्याने त्यांना अपात्र तर कामाचा अनुभव असलेल्या बिनियास कॉटेकला पात्र ठरविण्यात आले. बिनियास कॉटेकने चिमणीच्या पाडकामासाठी 1 कोटी 20 लाखांची मागणी केली, पण ही रक्कम जास्त असल्याने आयुक्तांनी बिनियास कॉटेकसमवेत वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी महापालिकेत आयुक्त पी. शिवशंकर व बिनियास कॉटेक कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात वाटाघाटीसाठी बैठक झाली. 

बिनियास कॉटेक ही बंगळूरची कंपनी आहे. या कंपनीने वाटाघाटीत 1.20 कोटी रकमेच्या दोन टक्के कमी दरात पाडकामाची तयारी दर्शविली. यावर दोघांमध्ये एकमत झाले. दोन टक्के कमी दरामुळे महापालिकेचे 2 लाख 40 हजार वाचणार आहेत. आयुक्तांना 25 लाख रकमेपर्यंत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. मक्‍त्याची रक्कम यापेक्षा जास्त असल्याने हा मक्ता मंजूर करण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. 

"विहान'कडून रक्कम वसुलीची कार्यवाही 
चिमणी पाडकामासाठी महापालिकेने 2017 मध्ये विहान कंपनीला मक्ता दिला होता. पण पाडकाम मुहूर्ताला विलंब होत गेला. त्यामुळे या कंपनीने दर वाढवून मागितले होते. ही मागणी मान्य करीत महापालिकेने 8 लाखांचा ऍडव्हान्स कंपनीला दिला होता. नंतर मक्‍तेदाराने काम करण्यास नकार देऊन अंग काढून घेतले. त्यामुळे 8 लाखांचा ऍडव्हान्स वसूल करण्याबाबत महापालिकेकडून कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल