शहरातील खेळण्यांना आता मुलांच्या गर्दीची प्रतिक्षा 

khelni.jpg
khelni.jpg

सोलापूरः फिरणारी गाडी, मोटारसायकल, रिमोटवरची गाडी, रेल्वेगाडी अशी अनेक खेळणी रस्त्यातील काही चौकात लावली. पण, या खेळण्यातून बच्चे कंपनीला मिळणारा आनंद कोरोना संकटाने हिरावल्याची भावना बसव फुलारे यांनी व्यक्त केली आहे. 

मागील काही महिन्यापासून खेळणी व्यावसायिकांनी अत्यंत वेगळ्या प्रकारच्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील पार्क चौक व इतर परिसरात असलेल्या मोकळ्या जागांमध्ये व्यावसायिकांनी बच्चे कंपनीसाठी खेळणी मांडली आहेत. यामध्ये रिमोटवरील गाड्या, मोटारसायकल, घसरगुंडी, रेल्वे, फिरती खेळणी अशा कितीतरी प्रकारच्या खेळण्याचा समावेश आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून ही खेळणी गुंडाळून ठेवली होती. शंभर ते दीडशे कारागिर या खेळण्याच्या व्यवसायात काम करतात. खेळणी कामगार सिद्धू फुलारे यांनी सांगितले की, कोरोना लॉकडाउनमध्ये ही खेळणी कापड लावून गुंडाळली होती. रस्त्यावर कुणी येण्यास तयार नव्हते. तर लहान मुलांचा प्रश्‍नच नव्हता. मग रोजी रोटी तर चालली पाहिजे म्हणून बिगारी कामे शोधू लागलो. कधी शंभर दीडशे रुपयांचे काम मिळायचे तर कधी तेही मिळत नसे. या बंद खेळण्यांकडे पाहिले तर वाईट वाटायचे. खरे तर लहान मुलांवर देखील कोरोना संकटात अन्यायच झाला. आमच्या कमाईपेक्षा या मुलांचा खेळण्याचा आनंदही हिरावला गेला. 

आम्ही सर्वच कारागीर उपासमारीच्या स्थितीत सापडलो. कुठुनही उत्पन्नाची आशा नव्हती. शहरात खेळण्यावर कमाई अवलंबून असणारी अनेक जण होते. तरीही दररोज याच ठिकाणी सर्वाना भेटत होतो. अखेर आता काही दिवसापासून निदान खेळणी उघडून ठेवण्याची परवानगी मिळाली. या खेळणीसाठी खरेदीचा खर्च केला आहे. त्यावर एक ते दोन मजुरांची कमाई अवलंबून असते. गेल्या अनेक वर्षात अशी महामारी कुणी पाहिलीच नव्हती. नेहमी लहान मुलांची गर्दी खेळण्याभोवती असायची. पण आता खेळणी सुरू झाली आहे. मात्र. अजूनही पालकांची भीती गेली नाही. लहान मुले एकत्र खेळायला येत नाहीत. तेव्हा केवळ एक ते दोन मुलांना नियमानुसार अंतराने बसवून रेल्वेगाडीत चक्कर मारता येते. मात्र, मोठ्या घसरगुंडी सारख्या खेळण्यात एकाच वेळी अनेक मुले खेळतात. पण मुले येत नाहीत व जी मुले आली त्यांना इतर मुलांसोबत खेळण्याचा आनंद मिळत नाही. एरवी मुलांना खेळणी खेळण्याची ओढ असायची. आता मात्र खेळण्यांना मुलांची प्रतिक्षा करावी लागत आहे असेही त्यांनी सांगितले. जत्रा, यात्रा जेव्हा भरतील तेव्हा खरा रोजगार मिळेल असे या कारागिरांचे म्हणणे आहे. 

मुलांची गर्दी नाही 
मागील काही महिन्यात कमाईच नव्हती म्हणून रेशनच्या तांदळावर दिवस काढले. आता खेळणी मांडून बसलो आहोत पण दोन चार मुले येतात. एवढ्या खेळण्यांपैकी मुले एखादेच खेळणे खेळतात. पूर्वी भरपूर मुले एकत्र येऊन खेळायची पण आता मुलांची वाट पाहावी लागते. 
- सिद्धू फुलारे, खेळणी व्यावासायिक.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com