esakal | आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा; 16 ऑक्‍टोबरला कारखान्यावर शिखर बॅंकेची जप्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

Clear the way for leasing out Adinath co operative Sugar Factory

सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी एक हत्ती सत्ता बागल गटाच्या ताब्यात दिली. मात्र वारंवार संचालक मंडळात होणारे मतभेद आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्याची वेळ आल्याची सर्वसामान्य सभासदांची एका बाजूला भावना आहे. तर दुसऱ्या बाजुने आता बारामती ऍग्रोच्या माध्यमातून आदिनाथ चांगला चालून ऊसाचा प्रश्न सुटेल व भाव चांगला मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी ठेऊन आहेत. 

आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा; 16 ऑक्‍टोबरला कारखान्यावर शिखर बॅंकेची जप्ती 

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाचे अधिकार 15 ऑक्‍टोबर रोजी संपुष्टात येऊन ता. 16 ऑक्‍टोबर रोजी राज्य सहकारी बॅंक कारखान्याचा ताबा घेणार आहे. त्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शिखर बॅंक घेणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हा कारखाना चालवण्यास घेण्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. 
गेली वर्षभरापासून आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्यासाठी सभासदांच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याचे बंधन आहे. मात्र कोरोनाच्या काळात सर्वसाधारण सभा घेण्यासाठी साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारल्याने कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय कसा होणार? याविषयी तालुक्‍यात उलटसुलट चर्चा सुर होती. सभासद सर्वसाधारण सभेत कारखाना भाडेतत्वावर देण्यास प्रंचड विरोध करतील अशीही एक चर्चा सुरू होती. मात्र कारखान्यावर राज्य बॅंकेने जप्ती आणल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आदिनाथ कारखान्यावर बागल गटाची सत्ता असून गेल्या महिन्यात मुंबई येथे आदिनाथविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, आदिनाथच्या आर्थिक सह्याचे अधिकार असलेल्या संचालिका रश्‍मी बागल, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या बरोबर झालेल्या बैठकीनंतर आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर चालवण्याचा व मकाईला कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याचे मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी सांगितले होते. या बैठकीनंतर आदिनाथ भाडेतत्वावर देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 
राज्य बॅंकेचे कारखान्याकडे 128 कोटीचे कर्ज आहे. तर कारखान्याकडे साधारणपणे 110 कोटीची साखर शिल्लक आहे. मात्र बॅंकेचे कर्ज वेळेत फेडले नसल्याने बॅंकेने ही कारवाई केली आहे. बॅक लवकरच कारखान्यासह सर्व मालमत्ता ताब्यात घेणार आहे. त्यानंतर बॅंक कारखान्याविषयीचा निर्णय घेणार आहे. 
सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी एक हत्ती सत्ता बागल गटाच्या ताब्यात दिली. मात्र वारंवार संचालक मंडळात होणारे मतभेद आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्याची वेळ आल्याची सर्वसामान्य सभासदांची एका बाजूला भावना आहे. तर दुसऱ्या बाजुने आता बारामती ऍग्रोच्या माध्यमातून आदिनाथ चांगला चालून ऊसाचा प्रश्न सुटेल व भाव चांगला मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी ठेऊन आहेत. 

डिसेंबरअखेर सुरू होईल कारखाना 
कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाने दोन वेळी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी दोन्ही वेळी नाकारली गेली. आता कारखान्याला राज्य बॅंकेची जप्तीची नोटीस आली आहे. 16 ऑक्‍टोबरला बॅंक कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेईल. त्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी बॅंक निविदा मागवेल. आमदार रोहित पवार यांचा बारामती ऑग्रो हा कारखाना चालवण्यास घेण्यास इच्छूक आहे. डिसेंबरअखेर हा कारखाना बारामती ऍग्रोमार्फत चालू होईल. 
- धनंजय डोंगरे, अध्यक्ष, श्री आदिनाथ साखर कारखाना. 

संपादन : वैभव गाढवे