"स्थायी'च्या सदस्यांची 18 फेब्रुवारीला निवड ! मार्चमध्ये सभापती ठरणार; कॉंग्रेस, एमआयएमची नाराजी शिवसेनेसाठी डोकेदुखी 

SMC
SMC

सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती असतानाही सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची वाटचाल संपर्क प्रमुखाविनाच सुरू आहे. जिल्हा समन्वयक दिसत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर एकसंघ शिवसेनेत आता दोन गट पडल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे दोन-तीन नगरसेवक कमळाच्या आश्रयाला गेले आहेत. तर कॉंग्रेस, एमआयएमही शिवसेनेच्या भूमिकेवर नाराज आहे. त्यामुळे 18 किंवा 20 फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची निवड करताना आणि मार्चमध्ये सभापतींची निवड करताना शिवसेनेचा कस लागणार आहे. 

पक्षीय बलाबलावर स्थायी समितीचे सदस्य निवडले जातात. संबंधित पक्षातील गटनेत्यांकडून आलेल्या नावांमधून सदस्य निवड केली जाते. महापालिका निवडणुकीस 11 महिने शिल्लक असल्याने चार वर्षांत एकही पद न मिळालेल्या सदस्यांना आता स्थायी समितीत संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी, शिवसेनेचे तत्कालीन संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून राजकुमार हंचाटे यांची तर स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी गणेश वानकर यांची शिफारस केली होती. त्यानुसार वानकर यांनी उमेदवारी अर्ज भरला तर हंचाटे यांच्याऐवजी कोठे हेच विरोधी पक्षनेते कायम राहिले.

आता संपर्कप्रमुखच नसल्याने त्याबाबतचा ठोस निर्णय कोण घेणार, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य होईल का, असे प्रश्‍न विरोधी पक्षनेत्यांसमोर आहेत. तर महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांमधील नगरसेवक व गटनेत्यांची नाराजी दूर करण्यासाठीही पक्षाकडे बडा तथा वरिष्ठ नेता नाही. या पार्श्‍वभूमीवर पक्षांर्तगत व महाविकास आघाडीच्या पक्षांमधील नाराजी दूर करण्यासाठी जिल्ह्याला नवे संपर्कप्रमुख, जिल्हा समन्वयक मिळणार का, पक्षीय बलाबलात महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचाच नगरसेवक स्थायी समितीचा कारभारी होणार का, याची उत्सुकता लागली आहे. 

सभापतिपदाची भाजपला लागणार लॉटरी 
विषय समित्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षातील गटनेते एकत्र येऊनही भाजपने अचूक रणनीतीद्वारे चार समित्या मिळविण्यात यश मिळविले. एमआयएमच्या नगरसेविकेने थेट भाजपलाच मतदान करीत शिवसेनेविरुद्धची नाराजी स्पष्ट दाखवून दिली. नगरसेविका तस्लिम शेख यांना पक्षातून निलंबित केल्याचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी स्पष्ट केले. मात्र, शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी उघडपणे भाजपला मदत करूनही त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. दरम्यान, सभागृहात विविध विषयांवर महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने एकत्र यावे, अशी अपेक्षा असतानाही कॉंग्रेसच्या भूमिकेवर शिवसेना गप्पच बसल्याने गटनेते चेतन नरोटे यांनी स्थायी समितीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असा इशारा दिला आहे. तर शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते यांच्या भूमिकेमुळेच आमचा विषय समित्यांमध्ये पराभव झाल्याची खंत एमआयएम नगरसेवकांमध्ये असून तौफिक शेख यांनी यापुढे महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थायी समितीचा सभापतीही आमचाच होईल, असा विश्‍वास भाजप पदाधिकाऱ्यांना वाटू लागला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com