बार्शीत कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलची निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

आमदार राजेंद्र राऊत यांनी वैद्यकीय विभाग, नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन सद्यःपरिस्थितीचा आढावा घेतला. 

बार्शी(सोलापूर)ः बार्शी तालुक्‍यातील जामगाव (आ), वैराग व शेंद्री या तीन गावांत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले तसेच तीन जण बाधित झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात रुग्णांची वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन लातूर रस्त्यावरील बीआयटी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय शनिवारी बैठकीत घेण्यात आला. 
आमदार राजेंद्र राऊत यांनी वैद्यकीय विभाग, नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन सद्यःपरिस्थितीचा आढावा घेतला. 

हेही वाचाः धोका पत्करुन वाचवला तरुणाचा डोळा 

तालुक्‍यासाठी कोविड केअर सेंटर (सी. सी. एच.) व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डी. सी. एच.) अशा दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्याचे ठरले. लातूर रस्त्यावरील बीआयटी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे ठरले असून त्याचा ताबा घेण्यात आलेला आहे. सेंटरची निर्मिती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

हेही वाचाः पंढरपुरात झाले धान्य खरेदी विक्रीचे केंद्र 

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (100 बेडचे) वैराग येथे, सोलापूर रस्त्यावरील सासुरे फाट्याजवळील साई आयुर्वेद कॉलेज या ठिकाणी सुरू करण्याचे ठरले. शासकीय यंत्रणांची मदत घेऊन हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची (आय. एम. ए.) मंजुरी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. 
कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यांमध्ये सेवा देण्यासाठी बार्शीतील खासगी डॉक्‍टरांनी तत्परता दाखविलेली आहे. यासाठी त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बी. वाय. यादव यांनी या दोन कोविड हॉस्पिटलला सेवा देणार असल्याचे सांगितले. 
नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, तहसीलदार प्रदीप शेलार, पोलिस उपअधीक्षक सिद्धेश्‍वर भोरे, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. शीतल बोपलकर, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, डॉ. बी. वाय. यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे होनमुटे, पांगरी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. ढगे, डॉ. विजय गोदापुरे, डॉ. जगताप तसेच संबंधित अधिकारी बैठकीस उपस्थित होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of Covid Care Center and Covid Hospital in Barshi