पंढरपुरात शंभर कोटींच्या नवीन कौठाळी, गुरसाळेला जोडणाऱ्या चौपदरी पुलाची निर्मिती सुरू ! उंची 455 मीटर 

अभय जोशी 
Friday, 1 January 2021

राष्ट्रीय महामार्ग कामांतर्गत आता बायपास रोडसाठी भीमा नदीवर कौठाळी आणि गुरसाळे गावांना जोडणारा आणखी एक नवीन पूल बांधण्यात येत आहे. या पुलाची समुद्रसपाटी पासूनची उंची 455 मीटर इतकी असणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुलांपेक्षा नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाची उंची जास्त ठेवण्यात आली असल्याने पूर परिस्थितीत पंढरपूरचा संपर्क कायम ठेवण्यास या पुलाची मोठी मदत होणार आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रीय महामार्ग कामांतर्गत पंढरपूर शहराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल अशा भीमा नदीवरील नवीन पुलाच्या कामाला सुरवात करण्यात आली. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून एका वर्षात हा चौपदरी पूल उभारण्यात येणार आहे. सध्याच्या येथील अस्तित्वातील पुलांपेक्षा हा नवीन पूल उंच होणार असल्याने पूरपरिस्थितीत तसेच यात्रा आणि वर्षभरातील जड वाहनांच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 

पंढरपूर येथे श्री अंबाबाई मैदानाजवळ जुना दगडी पूल आहे. त्याच्या शेजारी नवीन पूल बांधण्यात आला आहे. त्याची उंची 446.75 मीटर आहे. जुन्या दगडी पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सरगम चित्रपटगृहाच्या समोरील रस्त्यावर अहिल्या पूल बांधण्यात आला आहे. त्याची उंची 447.20 मीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग कामांतर्गत आता बायपास रोडसाठी भीमा नदीवर कौठाळी आणि गुरसाळे गावांना जोडणारा आणखी एक नवीन पूल बांधण्यात येत आहे. या पुलाची समुद्रसपाटी पासूनची उंची 455 मीटर इतकी असणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुलांपेक्षा नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाची उंची जास्त ठेवण्यात आली असल्याने पूर परिस्थितीत पंढरपूरचा संपर्क कायम ठेवण्यास या पुलाची मोठी मदत होणार आहे. 

असा असणार पूल 
आळंदी - पुणे - पंढरपूर - मोहोळ या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत हा पूल बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा पूल चार पदरी असणार असून, याची उंची आणि रुंदीदेखील जास्त ठेवण्यात आली आहे. रुंदी सुमारे 32 मीटर तर पुलाची लांबी 525 मीटर इतकी असणार आहे. वर्षभरात सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of a new four lane bridge worth Rs hundred crore begins in Pandharpur