बार्शी पोलिस ठाण्यात ठेकेदाराचा चक्कर येऊन मृत्यू 

प्रशांत काळे 
Wednesday, 22 April 2020

सहा तासानंतरही पंचनामा नाही 
दरम्यान, हेमंत नडगिरे यांचा मृत्यू होऊन सहा तास उलटून गेले तरी तहसीलदार यांच्या समक्ष अथवा त्यांच्या प्रतिनिधी समवेत पंचनामा करणे जरुरीचे असताना तहसील कार्यालयाचे कुणीही उपस्थित झाले नाही. त्यामुळे शवविच्छेदन झाले नाही. रात्री नऊ वाजता तहसीलदार यांनी प्रतिनिधीची नेमणूक केली. 

बार्शी (जि. सोलापूर) : आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी सुरु असताना शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक सहाच्या मागे सुरु असलेल्या बांधकामावर चार कामगार काम करत होते. पोलिसांनी त्यांना पकडून आणल्यानंतर त्या कामगारांना भेटण्यास आलेल्या ठेकेदारास पोलिस ठाण्यातच चक्कर आली. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. बार्शी पोलिसांत अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. तर चार कामगारांवर गुन्हा दाखल झाला आहे. 
हेमंत पंढरीनाथ नडगिरे (वय 54, रा. नागणे प्लॉट) असे मृत्यू झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. रामलायक हिरामन राम (वय 34), सुरेश जुगनराम पासवान (वय 38), सुनिलकुमार राजेंद्र राम (वय 26), शिवपुजन शंकर यादव (वय 30, सर्व रा. बिहार, सध्या सोलापूर रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हनुमंत पाडूळे यांनी फिर्याद दाखल केली. 
अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही बार्शी येथे बांधकाम चालू होते. कामावर मजूरांच्या तोंडाला मास्क नव्हते, सोशल डिस्टन्सिंग नव्हते, सॅनिटायझरची सोय करण्यात आली नाही म्हणून पोलिसांनी कामगारांना पोलिस ठाण्यात आणले. कामगारांना पोलिस घेवून गेले असल्याची माहिती ठेकेदार हेमंत नडगिरे यांना समजताच ते पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांना चक्कर आली व कोसळले. त्यांना त्वरीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण त्यांचा औषध उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सुगांवकर करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contractor dies of death at Barshi police station